22.3 C
Latur
Saturday, September 7, 2024
Homeसोलापूरडीसीसी बँक : वसुली प्रक्रिया सुरू असल्याने नुकसान झाले नसल्यावर सहमत

डीसीसी बँक : वसुली प्रक्रिया सुरू असल्याने नुकसान झाले नसल्यावर सहमत

सोलापूर: जिल्हा बँकेतूनज्या कर्जदारांनी कर्ज घेतले त्यांच्याकडील वसुलीची प्रक्रिया अजूनही सुरुच आहे. त्यामुळे या प्रकरणात बँकेचे नुकसान झाले असे म्हणता येणार नसल्याचा उलटतपास अ‍ॅड. उमेश मराठे यांनी केला. त्यांच्या या उलट तपासाला बँकेच्या अधिकाऱ्यांनीही सहमती दर्शविली आहे. पुढील सुनावणीत कर्ज खात्याची सविस्तर माहिती व कागदपत्र बँक सादर करणार आहे. जिल्हा बँकेच्या उलट तपासाची पुढील सुनावणी आता १७ एप्रिलला होणार आहे.

जिल्हा बँकेच्या आर्थिक नुकसानीस जबाबदार असलेल्या माजी संचालक, अधिकारी व कर्मचारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेत बँकेच्यावतीने सादर करण्यात आलेल्या पुराव्यांवर व प्रतिज्ञापत्रांवर सध्या संचालक / अधिकारी/कर्मचारी यांच्यावतीने स्वतः/वकिलामार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी देसाई यांचा उलट तपास सुरू आहे. या माजी संचालकांच्या / मयत संचालकांच्या वारसांच्या वतीने अ‍ॅड. मराठे उलट तपास घेत आहेत. अ‍ॅड. मराठे यांच्या उलट तपासाचे काम आज जवळपास ७० ते ८० टक्के पूर्ण झाले आहे.

आजच्या सुनावणीत कागदपत्र नसल्याने पुढील सुनावणीत ही कागदपत्र सादर करण्याचे ठरले आहे. कर्जदारांनी घेतलेल्या कर्जाचे काही हप्ते भरले आहेत. कर्जाची वसुली सुरू आहे. तारण मालमत्ताही जागेवरच आहे. त्यामुळे पूर्ण रकमेचे नुकसान झाले असे म्हणता येणार नसल्याचा मुद्दाही अ‍ॅड. मराठे यांनी आजच्या उलट तपासात मांडला.माजी संचालक आमदार बबनराव शिंदे, आमदार संजय शिंदे, माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप, माजी महापौर नलिनी चंदेले, मयत संचालक कै. बाबूराव चाकोते यांचे वारस माजी आमदार विश्वनाथ चाकोते, राजशेखर शिवदारे, बबनराव आवताडे, सुरेखा ताटे यांच्यावतीने अ‍ॅड. मराठे यांनी वकीलपत्र घेतले आहे.

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी उपमुख्यमंत्री दिलीप सोपल, यांनी या प्रकरणात नोटीस स्वीकारली नाही. चौकशी प्रकरणापासून ते अलिप्त होते. या प्रकरणात अ‍ॅड. अभिजित कुलकर्णी यांच्याकडे मोहिते-पाटील व सोपल यांनी वकीलपत्र दिले आहे. सोपल व मोहिते-पाटील यांच्यावतीने वकिलामार्फत घेतल्या जाणाऱ्या उलट तपासाला १७ एप्रिलपासून सुरवात होण्याची शक्यता आहे. या उलट तपासात सोपल व मोहिते-पाटील यांच्यावतीने वकील कशा पद्धतीने उलट तपास घेतात ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR