लातूर : प्रतिनिधी
येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सेंटिनेल लॅब सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे आता डेंगी, चिकनगुण्याचा अहवाल २४ तासांच्या आत रुग्णांना मिळणार असल्याने रुग्णांवर तातडीने योग्य उपचार सुरु करता येणार आहेत.
डेंगी, चिकनगुण्या या आजरांची साथ लातूर शहरात सातत्याने पसरते. सरकारी रुग्णालयाबरोबरच खासगी रुग्णालयातही रुग्णांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. रुग्णांना डेंगी, चिकनगुण्या झाला आहे की नाही, हे पाहण्यासाठी रुग्णांचे रक्तजल नमुने नांदेड येथील प्रयोगशाळेत पाठवले जात होते. त्यामुळे तेथून १० ते १५ दिवसांनी रुग्णांचा अहवाल लातुरात मिळत असे. रुग्णांची संख्या जास्त असल्यानंतर अनेकदा चक्क महिनाभराने अहवाल प्राप्त झाल्याचीही उदाहरणे आहेत.
त्यामुळे लातुरातच सेंटिनल लॅब असावी, अशी मागणी केली जात होती. यासाठी शासनाने हिवताप विभागासाठी ९० हजार रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यातून विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सेंटिनेल लॅब नुकतीच सुरु करण्यात आली आहे. येथील हिवताप विभागातील २ तज्ज्ञ आणि रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. गेल्या काही दिवसांत १ हजाराहून अधिक रुग्णांच्या रक्तजल नमुन्यांची तपासणी या लॅबमध्ये झाली आहे.