नवी दिल्ली : वृत्तसंस्था
कॉम्प्युटर क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘डेल’ने मॅनेजर लेव्हलच्या सुमारे १२,५०० कर्मचा-यांना कामावरून काढून टाकलं आहे. कंपनीने सेल्स डिव्हिजनमध्ये मोठी फेररचना जाहीर केली आहे.
यामुळे ऑपरेशन्सचे आधुनिकीकरण आणि ‘एआय’वर लक्ष केंद्रित करण्याच्या रणनीतीचा एक भाग म्हणून ही कर्मचारी कपात करण्यात आली. ‘बिझनेस इनसाइडर’ने दिलेल्या वृत्तानुसार, कंपनीनं ६ ऑगस्ट रोजी अंतर्गत मेमोमध्ये कर्मचा-यांना या बदलांची माहिती दिली, ज्यात सेल्स टीमचं सेंट्रलायझेशन करणं आणि नवीन एआय-केंद्रित सेल्स युनिट तयार करण्याच्या योजनेची रूपरेषा देण्यात आली.
‘न्यूजबाइट’ने दिलेल्या वृत्तानुसार, यामध्ये किती कर्मचा-यांना नारळ देण्यात आलेला आहे याची नेमकी संख्या अधिकृतरित्या निश्चित करण्यात आलेली नाही, परंतु सुमारे १२,५०० कर्मचा-यांना कामावरून काढून टाकण्याचा फटका बसला आहे. याचा परिणाम डेलच्या सुमारे १० टक्के कर्मचा-यांवर झाला आहे.
ग्लोबल सेल्स मॉडर्नायझेशन अपडेट या नावानं हा मेमो सीनिअर एक्झिक्युटिव्ह बिल स्कॅनेल आणि जॉन बर्न यांच्याद्वारे पाठवण्यात आला. ‘लाइव्ह मिट’नं दिलेल्या वृत्तात, नेमक्या किती कर्मचा-यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे, याचा खुलासा करण्यात आलेला नाही. विक्री विभागातील अनेक कर्मचा-यांनी बंद किंवा फटका बसलेल्या सहका-यांना ओळखत असल्याचं सांगितलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कपातीचा फटका प्रामुख्यानं व्यवस्थापक आणि वरिष्ठ व्यवस्थापकांना बसला आहे.