-कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब
-सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने
नागपूर : प्रतिनिधी
भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख करून केलेल्या कथित अवमानाचे पडसाद शुक्रवारी विधानसभेत पुन्हा उमटले. विरोधी बाकावरील काँग्रेस आमदारांनी आपल्या आसनावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र लावल्याने सत्ताधारी पक्षाकडून आम्हालाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा लावण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी पुढे आली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी डॉ. आंबेडकर यांच्याविषयी आदर व्यक्त करत त्यांची प्रतिमा काढून टाकण्याची सूचना केली. त्यावर सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या. या गदारोळामुळे नार्वेकर यांनी सभागृहाचे कमकाज १० मिनिटांसाठी तहकूब केले. या दरम्यान सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आमने – सामने येत घोषणाबाजी सुरू केली.
मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी काँग्रेसकडून आज स्थगन प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र, राहुल नार्वेकर यांनी या प्रस्तावाला अनुमती दिली नाही. कामकाज सुरू होताच काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी मुंबई काँग्रेस कार्यालयावर भाजपकडून झालेल्या हल्ल्याचा मुद्दा उपस्थित केला. आमच्या पक्ष कार्यालयावर हल्ला करण्यात आला. दगड घेऊन काचा फोडल्या, खुर्च्या फेकण्यात आल्या. आमच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या फोटोवर शाई फेकण्यात आली. मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांचा फोटो फाडण्यात आला. या हल्ल्यात कार्यालयातील कर्मचारी जखमी झाले. काँग्रेस कार्यालय उद्ध्वस्त करण्यात आले. बहुमताच्या जोरावर भाजप सत्तेची मस्ती करीत असतील ते योग्य नाही, असे बजावत वडेट्टीवार यांनी सर्व हल्लेखोरांच्या कारवाई करण्याची मागणी केली.
या दरम्यान सभागृहात उपस्थित उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काँग्रेस आमदारांच्या बाकावर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेवरून आम्हालाही त्यांची प्रतिमा लावू देण्याची मागणी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर कोणत्या एकाचा अधिकार नाही. ते आपल्या सर्वांचे आहेत. त्यामुळे आम्हालाही त्यांची प्रतिमा लावण्याची परवानगी द्यावी, असे अजित पवार म्हणाले. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी सभागृहात फलक, महापुरुषांचे फोटो लावणे ही आपली परंपरा नाही. सार्वभौम सभागृहात नियमानुसार कामकाज झाले पाहिजे. संविधानातील नियमांचे पालन करावे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. अन्यथा आपल्याकडून संविधानाचा अपमान होऊ शकतो, असे सांगत राहुल नार्वेकर यांनी काँग्रेस सदस्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा काढण्याची सूचना केली.
सभागृहात आरोप-प्रत्यारोप
यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. महायुतीच्या आमदारांकडून आघाडीच्या आमदारांचा उल्लेख ढोंगी असा केला जात होता तर आघाडीकडून ‘जयभीम’चा गजर करून प्रत्युत्तर दिले जात होते. सभागृहात सुरू असलेला गोंधळ लक्षात घेऊन राहुल नार्वेकर यांनी सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब केले.