19.2 C
Latur
Thursday, January 23, 2025
Homeलातूरड्रायफ्रुटच्या दरात २० टक्क्यांनी वाढ

ड्रायफ्रुटच्या दरात २० टक्क्यांनी वाढ

लातूर : प्रतिनिधी

शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त असलेल्या पौष्टिक ड्रायफ्रुटच्या मागणीत गतवर्षाच्या तुलनेत १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली असल्याची माहिती लातुरातील किरकोळ व्यापारी सादिक बागवान यांनी दिली. वाढत्या थंडीमुळे ड्रायफ्रुटची मागणी वाढली तसे दरही वाढले आहेत. शहरातील किरकोळ बाजारात काही दिवसापांसून काजू, बदाम, अक्रोडच्या मागणीत वाढ झाली आहे. सध्या बाजारात कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तसेच मंगळुरू, गोवा, केरळ येथून काजूची आवक होत आहे तर बदामाची आवक अमेरिकेतील कॅलिफोर्नियातून होत आहे तसेच इराणमधील मॉमेरोन जातीच्या बदामाची आवक होत आहे. काजूची आवकही सांगली येथून शहरातील बाजारपेठेत होत आहे. काजूच्या नवीन हंगामाची सुरुवात झाली असून त्याला मागणीही चांगली आहे. त्याच बरोबर अक्रोडची आवक दक्षिण अमेरिकेतील चिलीतून होत आहे. अमेरिकेतून अक्रोडची आवक होत असली तरी चिलीच्या अक्रोडची प्रतवारीही चांगली आहे.

इराण आणि अमेरिकेतून पिस्त्याची आवक होते. त्यातच पुढील काही दिवसांत काश्­मीरमधील अक्रोडचा हंगाम सुरू होईल. गतवर्षाप्रमाणे थंडीत ड्रायफ्रुटच्या मागणीत वाढ होते. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यापर्यंत ड्रायफ्रुटला चांगली मागणी राहते, असेही त्यांनी सांगितले. हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी व्यायामाबरोबरच आहारवरही लक्ष केंद्रीत केले जाते. हिवाळा या मोसमात जीममध्ये जाणा-यांची संख्या वाढत असते. व्यायामासोबत पोषक असा आहार घेण्यासाठी डिंक, शेंगदाणे आदींपासून तयार केलेले लाडूंचा वापरही मोठ्या प्रमाणात केला जातो. हे पदार्थ बनविण्यासाठी ड्रायफ्रुट वापरले जात असल्याने काजू, बदाम, पिस्ता, खारिक, खोबरे आदींना प्रचंड मागणी असते. गतवर्षाप्रमाणे यंदाही थंडीची लाट वाढत जात आहे. त्याच प्रमाणे ड्रायफ्रुटच्या मागणीत वाढ होत असल्याचे व्यापारी सादिक बागवान यांनी सांगितले आहे.

हिवाळा ऋतूतील हवामान पचन शक्तीसाठी पुरक असल्याने अनेक नागरिक आरोग्यासाठी ड्रायफ्रुट खातात. यात काजू, बदाम, अक्रोड, अंजीर, पिस्ता, खारिक, खजूर, मनुका असे अनेक पदार्थ असतात. गत महिनाभरात ड्रायफ्रुट आणि पौष्टिक लाडूंच्या मागणीत दुपटीने वाढ झाल्याचे व्यापारी वर्गाने सांगितले आहे. दीपावलीपासून थंडीला सुरुवात झाल्याने या थंडीच्या दिवसांत शरीरासाठी पौष्टिक पदार्थ खावेत, असा सला डॉक्टरही देत असतात. महिनाभरापासून लातूर बाजारपेठेत विविध प्रकारचे ड्रायफ्रुट तसेच डिंकाचे लाडू, काजू, किसमीस, खजूर, खारीक, खोबरे, मनुका यांची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. शहरातील किरकोळ बाजारात अंजीर ६०० ते १२०० रुपये प्रती किलो, काजू ६०० ते ८०० रुपये किलो, अक्रोड १२०० रुपये किलो, बदाम ६०० ते ८०० रुपये किलो, पाढंरा डिंक ३०० रुपये किलो, खारीक २८० ते ४५० रुपये किलो, जरदालू १०० ते २२० रुपये किलो, पेंडखजूर १०० ते १२० रुपये किलो, किसमीस २०० ते ३०० रुपये किलो, काळा मनुका ४०० ते ७०० रुपये किलो, खोबरे १४० ते २०० रुपये किलो, पिस्ता नमकीन १००० रुपये किलो, हिरवा पिस्ता १८०० रुपये प्रती किलो दराने विक्री केली जात असल्याचे किरकोळ व्यापा-यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR