जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यातील ढोरसांगवी ते धामणगाव दरम्यान असलेल्या रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे . हा खड्डा एवढा मोठा आहे की या ठिकाणी वाहन अडकून बसत आहे . यामुळे अनेक खाजगी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. आता तर चक्क या खड्ड्यामुळे परिवहन महामंडळाने ढोरसांगवी येथे येणारी मुक्कामी बस बंद केलेली आहे . यामुळे प्रवासी तसेच विद्यार्थ्यांची अडचण निर्माण झाली आहे.
अहमदपूर आगाराची अहमदपूर ते ढोरसांगवी ही मुक्कामी बस दररोज ढोरसांगवी येथे येत असे व सकाळच्या सुमारास अहमदपूर कडे जात असे , यामुळे शाळकरी विद्यार्थी तसेच अहमदपूर येथे काही कामानिमित्त जाणारे नागरिक यांची सोय होत होती. अनेक वर्षापासून ही बस ढोरसांगवी येथे मुक्कामी आहे मात्र ज्या मार्गावरून एसटी धावते त्या ठिकाणी रोडवर मोठा खड्डा पडला आहे . या खड्ड्यामुळे अखेर परिवहन महामंडळाला आपली बस सेवा बंद करावी लागली . याचा फटका अनेकांना बसत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने ज्या ठिकाणी मोठा खड्डा आहे तसेच रोड नादुरुस्त आहे अशा ठिकाणी रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी सरपंच प्रतिनिधी दिलीप सोनकांबळे यांनी केली आहे.