22.3 C
Latur
Saturday, September 7, 2024
Homeसंपादकीयतंत्रकल्लोळ !

तंत्रकल्लोळ !

मानवी समाजाच्या प्रगतीचा विस्मयकारक टप्पा म्हणून ज्याचे अपार कौतुक सा-या मानवजातीला आहे ती तांत्रिक क्रांती मानवी समाजरचनेच्या मुळावर उठणार का? असा प्रश्न निर्माण करणा-या अनेक घटना आताशा कानावर पडतात. त्यावर तात्पुरती चर्चाही होते. मात्र, या चर्चा पाण्यावरील बुडबुड्याप्रमाणे विरून जातात कारण या तंत्रक्रांतीने समाजातील सर्व घटकांचे जीवनमान पुरते व्यापून टाकले आहे. कुणी असा दावा करत असेल की, माझा तंत्रक्रांतीशी काही संबंध नाही, मी स्मार्टफोनही वापरत नाही. मात्र, हा दावा फोलच ठरतो कारण त्याच्या जगण्यातल्या प्रत्येक घटकाला तंत्रक्रांतीने व्यापलेले आहे व प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे त्याला या तंत्रक्रांतीचे फायदे-तोटे सोसावेच लागतात. ते कसे याचा प्रत्यक्ष अनुभव मायक्रोसॉफ्टमध्ये शुक्रवारी झालेल्या तंत्रकल्लोळाने अवघ्या जगाला दिला. शुक्रवारी जगात या तंत्रकल्लोळाने जो हलकल्लोळ उडवून दिला तो कोट्यवधी मनुष्यप्राण्यांचे व्यावहारिक, आर्थिक व भावनिक आयुष्य काही काळापुरते का असेना पण अस्थिर करून टाकणारा होता. थोडक्यात जगाला कोरोना महामारीच्या काळात जो हलकल्लोळ सोसावा लागला होता त्याच अनुभवाची पुनरावृत्ती शुक्रवारच्या तंत्रकल्लोळाने घडवली.

शुक्रवारी मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि जगातील कोट्यवधी संगणक, लॅपटॉपच्या स्क्रीनवर ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’चा मॅसेज अवतरला. या मॅसेजने जगभरातील ‘मायक्रोसॉफ्ट-३६५’ची सेवा ठप्प करून टाकली. या तंत्रकल्लोळाने मायक्रोसॉफ्टवर सायबर हल्ला झाल्याची चर्चा वा-यासारखी पसरली. मात्र, सुदैवाने हा सायबर हल्ला नव्हता तर ‘क्राऊडस्ट्राईक’ने केलेले एक सुरक्षाविषयक अपडेट या तंत्रकल्लोळास कारणीभूत ठरले. ‘क्राऊडस्ट्राईक’ ही सायबर सेक्युरिटी कंपनी आहे जी मायक्रोसॉफ्ट कंपनीला सायबर सुरक्षा पुरविण्याचे काम करते. मात्र, सुरक्षा पुरवितानाच चूक घडल्याने जगभर हा तंत्रकल्लोळ निर्माण झाला. त्याच्या परिणामी जगातील अनेक विमानसेवा बंद पडल्या, बँकांचे व्यवहार ठप्प झाले, एटीएम बंद पडले, शेअर बाजार खोळंबला, रुग्णालयांचे कामकाज बंद पडले. थोडक्यात एका क्षणात या तंत्रकल्लोळाने अवघे जग ठप्प करून टाकले. जगातील लाखो कार्यालये, लाखो संगणक, लाखो लॅपटॉप्स जागच्या जागी स्तब्ध झाली.

विमानसेवा कोलमडणे, बँकांचा व्यवहार ठप्प होणे, शेअर बाजाराचे कामकाज थांबणे अशा बाबींचा जबर आर्थिक फटका जगाला सहन करावा लागतो. तो सहन करावा लागू नये यासाठी स्वत: मायक्रोसॉफ्टने कोरोना काळात पुढाकार घेऊन जगातील कोट्यवधी लोकांना प्रशिक्षण दिले होते. मात्र, याच कंपनीला सायबर सुरक्षा देणा-या कंपनीची चूक झाली आणि जगाला अब्जोवधी डॉलर्सचा जबर आर्थिक फटका बसला. केवळ आर्थिकच नव्हे तर लक्षावधी लोकांना शारीरिक त्रासही सोसावा लागला कारण जगातल्या अनेक रुग्णालयांचे कामकाज या तंत्रकल्लोळाने ठप्प केले. रुग्णालयांनी गंभीर रुग्णांवरील उपचार व शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या. अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, सिंगापूर, फ्रान्स, स्कॉटलंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड या देशांना या तंत्रकल्लोळाचा सर्वांत जास्त फटका बसला असला तरी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे जगातल्या सर्वच देशांना याचा कमी-अधिक फटका सहन करावाच लागला. भारतात इंडिगो, स्पाईसजेट, अकासा या कंपन्यांना मोठा फटका सहन करावा लागला आहे. या काही तासांच्या विश्वव्यापी तंत्रकल्लोळाने जगात एकूण किती अब्ज डॉलर्सचा चुराडा झाला याचा नेमका आकडा शोधण्यासाठी आता अनेक महिने अभ्यास सुरू राहील.

आर्थिक फटक्याबरोबरच या तंत्रकल्लोळाने अगणित मानवी तासही वाया घालविले आहेत. शुक्रवारी सायंकाळपर्यंत सगळ्या यंत्रणा सुरळीत सुरू झाल्याने जगाने सुटकेचा श्वास सोडला खरा पण या काही तासांच्या तंत्रकल्लोळाने घडविलेले नुकसान भरून काढण्यासाठी पुढचे कित्येक दिवस लागतील. या तंत्रकल्लोळाने जगाला तंत्रक्रांतीने निर्माण केलेल्या अपरिहार्य पराधीनतेची जाणीवच करून दिली आहे. आपले दैनंदिन आयुष्य प्रचंड वेगाने ‘तंत्राधीन’ बनत चालले आहे. अर्थात तांत्रिक क्रांतीच्या या प्रपातात कुणीच स्वत:ला बाजूला वा वेगळे ठेवू शकत नाहीच. कोणतेही तंत्रज्ञान वा तंत्रसाधने न वापरणा-या वा वापरू न शकणा-यांची आयुष्येही या तंत्रक्रांतीने अलगद आपल्या कवेत घेतली आहेत. त्यामुळे रुग्ण म्हणून रुग्णालयात उपचार घेण्यासाठी गेलेल्या लक्षावधी लोकांना या तंत्रकल्लोळाचा फटका सहन करावाच लागला. तंत्रज्ञानाच्या प्रगतीने व जास्तीत जास्त वापराने समाजातील अनेक प्रश्न, समस्या, अंतर्विरोध कमी होतील हाच सर्व कंपन्यांचा दावा असतो. तो काही प्रमाणात योग्यही आहे.

मात्र, तो पूर्णपणे योग्य नाहीच, हे या तंत्रकल्लोळाने दाखवून दिले आहे. शुक्रवारचा तंत्रकल्लोळ चुकीने झाला हे स्पष्ट झाल्याने जगाला हायसे वाटले खरे पण अशा चुका ठरवून केल्या जाणार नाहीतच याची काय शाश्वती आहे? अशीच संकटे जर वारंवार येत राहिली तर जगाला किती आणि काय-काय सोसावे लागेल या विचारानेही थरकाप उडतो. योगायोग म्हणजे १९ तारखेला विज्ञान कथा दिन होता. जगभरात ज्या विज्ञान कथा लिहिल्या गेल्या त्यात असे तंत्रकल्लोळ जगात काय-काय उत्पात घडवू शकतात याची रंजक-थरारक-रोमांचक व मनाचा ठाव घेणारी कल्पनाचित्रे रंगविण्यात आली आहेत. मात्र, सत्य वा वास्तव कल्पनेपेक्षाही जास्त विदारक व त्रासदायक असू शकते याची अनुभूती शुक्रवारच्या तंत्रकल्लोळाने जगाला दिली आहे. तंत्रज्ञान हाती आल्याने मानवाची पराधीनता कमी झाल्याची भावना वाढीस लागली असली तरी शुक्रवारच्या तंत्रकल्लोळाने मानवाची तांत्रिक पराधीनता सुस्पष्ट केली आहे.

एकंदर तांत्रिक प्रगतीने मानवी जीवन सुकर व वेगवान केले असले तरी त्याची पराधीनता संपुष्टात आली, असे मात्र अजिबात नाही. उलट अगोदर निसर्गासमोर पराधीन असणारा मानव आता स्वत:च जन्माला घातलेल्या तंत्रज्ञानासमोरही पराधीनच ठरतो आहे. त्यावर तंत्रक्रांती जोवर उपाय शोधत नाही तोवर असे तंत्रकल्लोळ जगाला वेठीस धरत राहणार, मोठे नुकसान करत राहणार व मानवाला ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ याची जाणीव करून देत राहणार, हे मात्र निश्चित!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR