मुंबई : प्रतिनिधी
‘उस्तादजी जरी अनंतात विलीन झाले तरी त्यांच्या तबल्यावरचा ताल अनंत काळापर्यंत ऐकू येईल,’ अशा शब्दांत राज ठाकरेंनी भावना व्यक्त केल्या आहेत. प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी हृदयाशी संबंधित आजारामुळे निधन झालं. झाकीर हुसेन यांच्या निधनानंतर जगभरातील चाहते शोक व्यक्त करत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीसुद्धा त्यांच्यासाठी विशेष पोस्ट लिहून श्रद्धांजली वाहिली आहे.
जगप्रसिद्द तबला वादक, पद्मविभूषण, उस्ताद झाकीर हुसैन यांचं दु:खद निधन झाले निसर्गातील प्रत्येक गोष्ट एका लयीत सुरु असते, मग तो श्वास असू दे की वाहणारा वारा असू दे की फुलणारी फुलं असू देत, या प्रत्येकातील लय अगदी मोजक्या लोकांना जाणवते, अनुभवता येते, आणि अशी माणसं अतिशय लयबद्ध असतात, तालबद्ध असतात, आणि ती त्यांच्या क्षेत्रातील योगी पुरुष ठरतात. उस्ताद झाकीर हुसैन हे तबल्यातील ‘तालयोगी’ होते असं मला नेहमी वाटत राहिलं.
असं म्हणतात झाकीर हुसैन यांचे वडील अल्लाह रखा खान साहेबांनी, जाकीरजींच्या जन्मानंतर लगेचच त्यांच्या कानात हळूच तबल्याचे बोल सांगितले. असले जबरदस्त बाळकडू किती जणांच्या वाट्याला य्ोते मला माहित नाही, आणि जरी आलं तरी ते पेलवावं झाकीरजींनीच.