नायगाव : प्रतिनिधी
नायगाव तालुक्यातील लालवंडी येथील एका शेतातील भंडा-याच्या जेवणातून १०६ गावक-यांना विषबाधा झाली. ही घटना दि. १५ मे रोजी सायंकाळीच्या सुमारास घडली. ९१ जणांना उपचारासाठी नायगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून १५ जणांची प्रकृती खालावल्याने त्यांना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गावतील जवळपास २०० जणांनी भंडा-याचे जेवन केले होते. आणखी बाधीताची संख्या वाढण्याची शक्यत्ता डॉक्टरांनि वर्तवली आहे. या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी, नायगावमधील लालवंडी येथे दि. १५ मे रोजी काही शेतक-यांनी मिळुन शेतात असलेल्या महादेव मंदिरात भंडारा आयोजित केला होता. येथे सायकांळी पाच वाजता जेवणाला सुरूवात झाली, रात्री उशीरापर्यत हा कार्यक्रम सुरूच होता. जेवण केलेले अनेक गावकरी घरी गेले मात्र रात्री उशिरा काही नागरिकांनी मळमळ, उलटी व पोटदुखीचा त्रास सुरू झाला. तेव्हा मिळेल ते वाहन करून रुग्ण रात्री उशीरा उपचारासाठी नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल होऊ लागले. त्यांच्यावर उपचार सुरू झाले, तोपर्यंत पाहता पाहता जवळपास शंभर च्यावर गावकरी येथे उपचारासाठी दाखल झाले. सोबत अनेक नातेवाईक होते. यामुळे रूग्णालयात मोठी गर्दी झाली होती. येथील रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी व कर्मचा-यांच्या संख्या कमी असल्याने उपचार करणे अवघड झाले होते.
लालवंडी येथे आरोग्य पथक दाखल
भंडा-यातून विषबाधा झाल्यामुळे आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. माजंरम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी एस.एम. पिपंरे, डॉ. स्मिता मारकवाड, डॉ. शेख रफीक, डॉ. जाधव यांच्यासह अन्य कर्मचा-याचे पथक लालवंडीकर दाखल झाले असून येथील जिल्हा परिषद शाळेत हे पथक सात दिवस तळ ठोकून राहणार आहे.