लातूर : प्रतिनिधी
महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्या १०० दिवसांत धिरजभैय्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण केल्या जातील, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या तथा खासदार सुप्रियाताई सुळे यांनी दिले. त्याच बरोबर त्यांनी आमदार धिरज देशमुख यांच्या भाषणाचेही कौतुक केले. धिरजभैय्यांना पहिल्यांदाच त्यांच्या मतदारसंघात ऐकले. एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी केलेल्या भाषणाला माझा मानाचा मुजरा, अशा शब्दांत त्यांनी गौरव केला.
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या प्रचारार्थ दि. ९ नोव्हेंबर रोजी आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. या प्रसंगी सोलापूरच्या खासदार प्रणितीताई शिंदे, आमदार धिरज विलासराव देशमुख, विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई देशमुख, रीड लातूरच्या संस्थापक अध्यक्षा दीपशिखा देशमुख, स्वयंप्रभा पाटील, सुनिता अरळीकर, आशाताई भिसे, शिलाताई पाटील, दैवशाला राजमाने यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
पुढे बोलताना सुप्रियाताई सुळे म्हणाल्या, महाराष्ट्राची संस्कृती पुरोगामी विचाराची आहे; परंतु भाजपने महाराष्ट्रातील पक्ष फोडले, घर फोडले. आमचा पक्ष गेला, चिन्ह गेले, नेते गेले, महामंडळे गेली, सगळे गेले; परंतु जनता आमच्या सोबत राहिली आणि लोकसभेत महाविकास आघाडीचे खासदार जनतेने निवडून दिले. या सरकारने फक्त घरे फोडली नाहीत तर येथील उद्योग इतर राज्यात पळवून नेले. आमच्या बेरोजगारांच्या ताटातला घास हिसकावण्याचे पाप यांनी केले असल्याची जहरी टीका त्यांनी केली.
काँग्रेस पक्षाने देशाला इंदिरा गांधींसारख्या पंतप्रधान दिल्या. राजकारणात महिलांसाठी सोनिया गांधी यांनी ५० टक्के आरक्षण दिले. लातूर काँग्रेसनेसुद्धा आरक्षण नसताना महिलांना जिल्हा परिषद अध्यक्ष पद, महानगरपालिकेच्या पहिल्या महापौर, कारखान्याच्या चेअरमन, बँकेत संचालक म्हणून संधी दिल्याबद्दल त्यांचे कौतुक
केले. या विराट महिला मेळाव्याचे प्रास्ताविक पूजाताई इगे यांनी केले. सूत्रसंचालन प्राचार्या विद्या टेकाळे यांनी केले तर ज्योतीताई शिंदे यांनी आभार मानले.