मुंबई : प्रतिनिधी
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना महायुतीत असलेल्या गृहमंत्रीपदाच्या वादाबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्यांनी उत्तर देताना शिवसेनेकडे गृहमंत्रीपद नसल्याने मविआचे सरकार पडल्याचा खुलासा केला.
दरम्यान, राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन आठवड्याभराचा कालावधी उलटला आहे. पण अद्यापही राज्यात सत्ता स्थापन करण्यात आलेली नाही. खातेवाटप आणि इतर चर्चांमुळे महायुतीतील सत्ता स्थापनेचे घोडे अडलेले आहे. ज्यावरून विरोधकांकडून महायुतीचा खरपूस समाचार घेण्यात येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा याच मुद्द्यावरून महायुतीवर निशाणा साधला आहे.
गृहंत्रीपदाच्या वादाबाबत बोलताना त्यांनी म्हटले की, गृहखातं हे दुस-या क्रमांकाचे खाते आहे. कारण जेव्हा जेव्हा आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करायचो त्यावेळी ते सांगायचे की, गृहखाते हे दुस-या पक्षाकडे देण्याची चूक उद्धव ठाकरे यांनी करू नये. आमचे देखील तेच म्हणणे होते. गृहखाते, विधानसभेचा अध्यक्ष पद हे संवेदनशील विषय होते. ते आमच्याकडे नसल्याने आमचे सरकार पडले, नाहीतर ते पडले नसते, असे मोठे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.