मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून सात दिवस झाले आहेत. महायुतीतून मुख्यमंत्री कोणी व्हायचे हे ठरत नसल्यामुळे राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झालेले नाही. तर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीहून थेट साता-यातील दरे गावी गेले. त्यांची प्रकृती बरी नसल्याचे सांगितले गेले आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाने खोचक ट्वीट करत शिंदेंच्या आजारपणाला उतारा सांगितला आहे. सूरत, गुवाहाटी, गोवा येथील माती उतरून टाकावी आणि जमलंच तर मुख्यमंत्रिपद, गृहमंत्रिपद उतरून टाका, असा खोचक सल्ला ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिला आहे.
महायुतीला राज्यात २८८ पैकी २३० जागा मिळाल्या आहेत. भारतीय जनता पक्षाच्या सर्वाधिक जागा आल्या आहेत. त्यामुळे यावेळी मुख्यमंत्रिपद भाजपला मिळाले पाहिजे ही भाजप नेत्यांची भावना आहे. देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री केले पाहिजे, अशी आग्रही मागणी भाजपमधून होत असल्याची माहिती आहे. भाजपचे केंद्रीय नेतृत्वही यासाठी तयार आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही फडणवीसांच्या मुख्यमंत्रिपदाला पाठिंबा दिला आहे. मात्र अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत बंडखोरी करून भाजपला जाऊन मिळालेले एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपद सोडायला तयार नव्हते. भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या बैठकीआधी मोदींसोबत फोनवर बोलणे झाले आहे, मुख्यमंत्रिपदाबद्दल ते जो निर्णय घेतील त्याला पाठिंबा असेल असे त्यांनी ठाण्यातील निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे.