संयुक्त राष्ट्रे : वृत्तसंस्था
तालिबानने अलिकडेच नवा कायदा मंजूर केलेला आहे. या कायद्यानुसार महिलांना सार्वजनिक जागी संपूर्ण शरीराला झाकणे बंधनकारक आहे. यात चेह-याचा देखील समावेश आहे. या नवीन कायद्याप्रमाणे महिलांचा आवाज हा देखील खासगी मानला जाईल. त्या आवाजाला सार्वजनिक ठिकाणी ऐकण्यास देखील मनाई आहे. या नियमामुळे महिलांना कोणतेही गाणे म्हणणेच काय तर सार्वजनिक ठिकाणी बोलणेही महागात पडू शकते. याशिवाय महिलांना पर पुरुषाकडे पाहण्यासाठी देखील मनाई करण्यात आली आहे.
तालिबान त्यांच्या कट्टरवादासाठी कुप्रसिद्ध आहे. अफगाणिस्तानात तालिबानी राजवट येऊन आता तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. या दरम्यान तेथील महिलांवरील अत्याचारात वाढच होत आहे.
सर्वोच्च नेते हिबतुल्लाह अखुंदजादा यांनी या निर्णयासंदर्भात बुधवारी कायदा पास केला. या कायद्यांतर्गत सार्वजनिक परिवहन, संगीत, शेव्हींग आणि उत्सव सारख्या दैनंदिन जीवनातील नित्य व्यवहारांना देखील सामील केले गेले आहे. या नवीन फतव्यानुसार महिलांना पर-मुस्लीम पुरुष आणि महिलांच्या समोर स्वत:ला संपूर्ण झाकावे लागले. या शिवाय कायद्यात हे स्पष्ट केलेले आहे की महिलांना पातळ, पारदर्शक आणि तंग कपडे देखील परिधान करायला नकोत असा दंडक आहे. हे नियम पाळले नाही तर महिलांना दंड आणि शिक्षेला सामोरे जावे लागू शकते.
संयुक्त राष्ट्र संघटनेने या तालिबानी नियमांसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. अशा प्रकारचे नियम आणि कायदे महिलांचे आणि तरुणींचे जीवन अधिक संकटात टाकतील. आंतरराष्ट्रीय समुदायाने या मुद्यांचा गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. कारण हा केवळ अफगाणिस्तानी महिलांच्या अधिकारांचा विषय नसून मानवी अधिकारांचे देखील उल्लंघन असल्याचे संयुक्त राष्ट्र संघटनेने म्हटले आहे.