24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeराष्ट्रीयतिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी?

तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी?

चंद्राबाबू यांचा आरोप, जगनमोहन रेड्डींवर हल्लाबोल, लॅबच्या रिपोर्टचा दिला हवाला

अमरावती : वृत्तसंस्था
देशातील प्रसिद्ध तिरुपती मंदिरात प्रसादाचे लाडू बनविण्यासाठी वापरल्या जाणा-या तुपात प्राण्याची चरबी असल्याचा आरोप आंध्र प्रदेशातील सत्ताधारी तेलुगू देसमचे नेते तथा मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे. नायडू यांनी विरोधी पक्ष असलेल्या वायएसआर कॉंग्रेसवर जोरदार हल्ला चढविला. तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर मंदिरात हे लाडू अर्पण केले जातात. यावरून सर्वत्र खळबळ उडाली आहे. परंतु जगनमोहन रेड्डी यांनी हा राजकीय आरोप असून, यात काहीही तथ्य नसल्याचे म्हटले आहे. परंतु यावरून वाद रंगण्याची चिन्हे आहेत.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यावर गंभीर आरोप करताना तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर मंदिरात तयार होणा-या प्रसादाच्या लाडूमध्ये तुपाऐवजी जनावरांची चरबी वापरण्यात आल्याचे म्हटले आहे. हा प्रसाद भक्तांना दिला जातो आणि त्याला अत्यंत पवित्र मानले जाते. नायडू यांनी हा आरोप एनडीएच्या विधिमंडळ बैठकीत केला. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

एका खाजगी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार गुजरातमध्ये केंद्र सरकारद्वारे चालविल्या जाणा-या नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या पशुधन व अन्न विश्लेषण आणि अध्ययन केंद्राच्या प्रयोगशाळेने यासंदर्भात एक अहवाल दिला. त्या अहवालानुसार वायएसआरसीपी सत्तेत असताना प्रसिद्ध तिरुपती मंदिरात प्रसादाचे लाडू बनविण्यासाठी वापरल्या जाणा-या तुपात प्राण्याची चरबी आढळून आली. तुपात फिश ऑईल, बीफ फॅट आणि चरबीचे अंश आढळून आले होते. तसेच चरबी एक अर्ध-घन पांढरे चरबी उत्पादन आहे. जे डुकराच्या चरबीयुक्त उतकांपासून घेतले जाते. लाडूसंदर्भात लॅबचा अहवाल जाहीर केल्याने आंध्र प्रदेशात खळबळ उडाली आहे. या मुद्यावरून चंद्राबाबू नायडू यांनी जगनमोहन रेड्डी यांना चांगलेच कोंडीत पकडले आहे.

लाडूला ३०० वर्षांचा इतिहास
प्रसाद म्हणून दिल्या जाणा-या या लाडूचा इतिहास ३०० वर्षांहून अधिक जुना आहे. याची खासियत म्हणजे हा लाडू बरेच दिवस खराब होत नाही. तसेच त्याची किंमतही १० ते २५ रुपयांपर्यंत आहे. त्यामुळे तिरुपतीला येणारा प्रत्येक भाविक हा प्रसाद घेऊन जातो. येथील प्रसादालयात दररोज ३ लाखांवर लाडू तयार केले जातात. या गुप्त स्वयंपाकघराला पोटू म्हणतात. याची स्वतंत्र व्यवस्था आहे. हे लाडू बनविण्यासाठी बेसण, बेदाणे, तूप, काजू आणि वेलचीचा वापर करतात.

लाडूसाठी सुरक्षा
तिरुपती बालाजीमध्ये मिळणारा लाडू घेण्यासाठई तुम्हाला सुरक्षा लाईनमधून जावे लागते. यामध्ये सेक्युरिटी कोड आणि बायोमेट्रिक तपशील जसे की फेशियल रेकग्निशन आदी गोष्टींतून जावे लागते. लाईनमध्ये पास दिला जातो आणि ज्या व्यक्तीला पास मिळाला, त्यांनाच लाडू दिला जातो. लाडू बनविण्यासाठी ५० कोटींची मशिन आहे.

रेड्ड्ींनी आरोप फेटाळले
माजी मुख्यमंत्री तथा वायएसआरसीपीचे नेते जगनमोहन रेड्डी यांनी यांनी तिरुमला लाडूच्या पवित्रतेवर असा आरोप करणारा व्यक्ती मंदिराच्या पवित्र भावनांचा अनादर करीत आहे. आम्ही, आमचे कुटुंब देवासमोर शपथ घेऊन सिद्ध करू शकतो की, आमच्या काळात कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झालेला नाही, असे स्पष्टीकरण दिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR