सोलापूर : वैकुंठ एकादशीनिमित्त दहा हजारांहून अधिक सोलापूरकरांनी तिरुपती येथील भगवान बालाजींचे दर्शन घेतले. दर्शन टोकन रांगेत झालेल्या चेंगराचेंगरीत पंचवीस सोलापूरकर भाविक जखमी झाले असून, सर्व भाविक सुखरूप असल्याची खात्री सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने केली. फोनवरून भाविकांशी संपर्क साधून जिल्हा आपत्ती व्यवस्थान विभागाने मदतीचे आश्वासन दिले आहे. प्राथमिक उपचारानंतर सर्वांची तब्येत चांगली झाली असून, ते सोलापूरला परतणार असल्याची माहिती भाविकांनी दिली.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापक शक्तीसागर ढोले यांनी तिरुपती येथील भाविकांशी संपर्क साधला. बालाजी दासरी यांच्याशी बातचीत करून त्यांना, तसेच
त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांनी मदतीचे आश्वासन दिले. शक्तीसागर ढोले यांनी सांगितले, निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार यांनी
तिरुपती येथील भाविकांशी संपर्क साधण्याची सूचना केली.
त्यानुसार आम्ही तिरुपती येथील भाविकांशी संपर्क साधला व सर्व भाविक सुखरूप असल्याची खात्री केली.तशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, तसेच निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार यांना दिली. सोलापुरात आल्यानंतर भाविकांची आम्ही भेट घेणार आहोत. भाविक बालाजी दासरी यांनी सांगितले की तिरुपती येथून दीड किलोमीटर अंतरावर एका बगीचा परिसरात ऑन दी स्पॉट दर्शन टोकनची व्यवस्था करण्यात आली होती.
अचानक गेट उघडल्याने टोकन रांगेतील भाविक एकाकी पुढे जाऊ लागले. गर्दीतून मागून धक्के बसू लागले. त्यामुळे समोरील भाविक एकाकी खाली पडले. गेट समोरचा भाग उतार होता. त्यामुळे मागील भाविकांनाही ते लक्षात आले नाही. भाविक एकमेकांवर पडल्यामुळे अनेकांचा श्वास गुदमरला. यात सहा भाविकांचा मृत्यू झाला. तर २५ हून अधिक सोलापूरकर भाविक जखमी झाले आहेत.