22.3 C
Latur
Saturday, September 7, 2024
Homeलातूरतीन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना फळांच्या रोपांचे वितरण

तीन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना फळांच्या रोपांचे वितरण

लातूर : प्रतिनिधी
वसुंधरा प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून लातूर शहरातील विविध शाळेत ‘एक विद्यार्थी-एक वृक्ष’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून लातूर शहरातील शाळांतील तीन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना फळांच्या झाडांचे वितरण करुन विद्यार्थ्यांना आपल्या आईच्या नावाने वृक्षांचे संवर्धन करण्याचे आवाहन केले जात आहे. शाळा प्रशासनाकडून ज्या विद्यार्थ्यांकडे वृक्ष लागवड करण्यासाठी जागा उपलब्ध आहे त्यांची यादी तयार करुन त्यांनाच ही रोपे दिले जात आहे.  या उपक्रमाला चांगला प्रतिसाद देखील मिळतो असून ३ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना फळांच्या रोपांचे वितरण करण्यात आले.
वसुंधरा प्रतिष्ठानतर्फे लातूर शहरातील सदानंद माध्यमिक विद्यालय, शिवाजी माध्यमिक विद्यालय, विशाल माध्यमिक विद्यालय, राजगुरू माध्यमिक विद्यालय, पी.एस. खुब्बा इंग्लिश स्कूल, इरा इंटरनॅशनल स्कूल यासह इतर शाळेत ‘एक विद्यार्थी-एक वृक्ष’ उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांना आंबा, पेरु, सीताफळ, जांभूळ, आवळा आदी फळांच्या रोपांचे वितरण करून त्यांच्या आईच्या नावाने हे वृक्ष लावण्यास सांगितले जाते. अगदी बालमनात विद्यार्थ्यांमध्ये वृक्षांचे महत्त्व कळावे यासाठी हा उपक्रम ३० ऑगस्टपर्यंत लातूर शहरातील बहुतांशी शाळेत राबविण्यात येणार असल्याचे वसुंधरा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा. योगेश शर्मा यांनी सांगितले.
उपक्रम राबविण्यापूर्वी वसुंधरा प्रतिष्ठानची टीम शाळेचे मुख्याध्यापक आणि वर्ग शिक्षक यांना भेटते. त्यानंतर शाळेच्या वतीने ज्या विद्यार्थ्यांच्या घरी वृक्ष लागवड करण्यासाठी जागा उपलब्ध आहे त्या विद्यार्थ्यांची नाव नोंदणी केली जाते. माहिती घेऊन खात्री पटल्यानंतरच संबंधित विद्यार्थ्यांना फळरोपांचे वितरण केले जाते.
सदर रोप आपल्या आईच्या नावाने लावण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले जाते .शिवाय घरी गेल्यानंतर वृक्ष लागवड केल्याचा पुरावा म्हणून फोटो काढून शाळेच्या व्हाट्सअप ग्रुप वरती विद्यार्थ्यांना टाकण्याच्या सूचना केल्या जातात. यासोबतच वर्ग शिक्षकांकडून दर महिन्याला वृक्ष संवर्धन होते का नाही याची खात्री केली जाणार आहे. वृक्षांची चळवळ ही लोकचळवळ होण्यासाठी या चळवळीत प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक  यांचा देखील यात मोलाचा वाटा आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR