सोलापूर : पुणे-सोलापूर महामार्गावरील एसटीचे थांबे असणारे तीन हॉटेलचे एसटीचे थांबे रद्द केल्याचे आदेश एसटी प्रशासनाने काढले आहेत. प्रवाशांना हॉटेलमधील कर्मचाऱ्यांकडून उद्धट वागणूक, हॉटेलमध्ये अस्वच्छता असल्याचा ठपका ठेवत कारवाई करण्यात आली आहे. यात इंदापूर तालुक्यातील डाळज नंबर ३ येथील हॉटेल उदय व्हेज नॉन व्हेज, खडकी येथील साई सागर व स्वामी चिंचोली येथील हॉटेल पंचरत्न या हॉटेलवरील एसटी बस थांबे बंद केले आहेत. वरील हॉटेलवर एसटी बस न थांबवण्याचा सूचना महामंडळाच्या संबंधित आगर प्रमुखांना दिल्या आहेत. पण तोपर्यंत या मार्गावरील एसटी गाड्यातील प्रवाशांना नजीकच्या स्थानकात जेवणाची व्यवस्था करून देण्याचे आदेश ही देण्यात आले आहेत.
सोलापूर जिल्ह्यातून जवळपासच्या तीर्थक्षेत्रावर जाण्यासाठी दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. शिवाय सोलापुरातून पुण्याला जाणाऱ्या प्रवशांची दररोजची संख्या हजारोत आहे. या प्रवाशांच्या सोईसाठी एसटी प्रशासनाकडून इंदापूर जवळ तीन हॉटेलमध्ये अधिकृत थांबे देण्यात आले होते.
त्यामधील काही हॉटेलवरील अपुऱ्या सुविधा, तसेच प्रवाशांना हॉटेल कर्मचाऱ्यांकडून मिळणारी उद्धट उत्तरे व खाद्य पदार्थासंदर्भात अनेक तक्रारी प्रवाशांनी एसटी प्रशासनाकडे केल्या होत्या. दरम्यान, काही प्रवाशांनी अन्न प्रशासन विभागाकडेही तक्रारी केल्या. या तक्रारीवरून अन्न प्रशासन विभागाने ही वारंवार दंडात्मक कारवाई केली होती. त्यानंतर ही हॉटेलमध्ये त्याच त्रुटी आढळून आल्या. यात त्यांनी वरील तीनही हॉटेलचे परवाने ४ ते ७ जानेवारी दरम्यान हॉटेलचे परवाने अन्न प्रशासनाने रद्द केले आहे.
दरम्यान, त्यामुळे महामंडळाच्या पुणे विभागाच्या विभाग नियंत्रकांनी तक्रारीनुसार चौकशी करून जिल्ह्यातील तीन अधिकृत बस थांबे बंद केले आहेत. शिवाय या मार्गावरील एसटी गाड्या वरील हॉटेलवर थांबवू नये, असे आदेश दिले आहेत. दरम्यान, याबाबत नाना पवार यांनी या घटनेचा पाठपुरवठा केला.