धाराशिव : ठाकरे गटाचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या उस्मानाबाद लोकसभेसाठीच्या उमेदवारी अर्जात त्रुटी राहिल्याने टांगती तलवार निर्माण झाली होती. यानंतर आता खासदार ओमराजे निंबाळकर यांचा अर्ज मंजूर करण्यात आल्याची माहिती दिली आहे. त्यांनी ट्वीट करून आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने आणि मायबाप जनतेच्या आशीर्वाद आणि शुभेच्छांमुळे सर्व काही सुरळीत असल्याचे म्हटले आहे.
ओमराजे निंबाळकर यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, मध्यंतरी मी भरलेल्या नामनिर्देशन पत्र (उमेदवारी फॉर्म) बाबत बातम्या बघून सर्व लोकांना काळजी वाटत होती की नक्की काय होतंय. पण आत्ताच कळले की नामनिर्देशन अर्जात काहीही त्रुटी नाही आणि तो मंजूर करण्यात आला आहे. म्हणून लगेच तुम्हा सर्वांना सोशल मीडियाद्वारे हे कळवत आहे.
आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने आणि मायबाप जनतेच्या आशीर्वाद आणि शुभेच्छांनी सर्व काही सुरळीत आहे. ही बातमी आल्यानंतर असंख्य सामान्य लोकांचे फोन आले, असंख्य लोकांनी काळजी दाखवली. असंख्य लोकांचे हे प्रेम, दाखवलेली काळजी हीच माझी कमावलेली पुंजी आहे; पण आता एक सांगू इच्छितो, फॉर्म संदर्भात काळजी नसावी.
आता आपल्या हक्कासाठी लढायला तयार रहा. ही निवडणूक माझ्या खासदारकीची नव्हे तर सामान्य जनतेच्या हक्काची आहे. मी फक्त तुमचा प्रतिनिधी म्हणून लढत आहे. आपल्या हक्काचा खासदार – ओमप्रकाश भूपालसिंह ऊर्फ पवन राजेनिंबाळकर.
अर्चना पाटील यांच्याही उमेदवारी अर्जात त्रुटी
दरम्यान, चार दिवसांपूर्वी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जात त्रुटी आढळल्या होत्या. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्याही उमेदवारी अर्जात त्रुटी असल्याचे समोर आले होते. ओमराजे आणि अर्चना पाटील यांनी चार दिवसांपूर्वी अर्ज दाखल केला होता. अर्जातील त्रुटी दूर करण्यासाठी १९ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली होती. जर १९ एप्रिलपर्यंत त्रुटींची पूर्तता झाली नाही तर, ओमराजे निंबाळकर आणि अर्चना पाटील यांचे अर्ज बाद केले जाणार असल्याचेही जिल्हाधिका-यांनी स्पष्ट केले होते.