लोहारा : प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील तोरंबा येथील नेताजी विलास चव्हाण या युवकाने मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मंगळवारी दि. २३ जानेवारी रोजी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. नेताजी चव्हाण या तरूणाने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दि. २४ रोजी सकाळी उघडकीस आली. त्यामुळे संतप्त झालेल्या सकल मराठा समाजाच्या वतीने माकणी गावातील चौकात ठिय्या मारत आंदोलन केले. या आंदोलनामुळे वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. राज्यात मराठा समाजाला आरक्षण द्यावे म्हणून सर्वत्र आंदोलने सुरू आहेत. मुंबई येथे आंदोलन करण्यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंतरवली सराटी ते मुंबई पायी यात्रा निघाली आहे.
मराठा आरक्षणासाठी अनेक तरूण आत्महत्या करताना दिसत आहेत. लोहारा तालुक्यातील तोरंबा येथील युवक नेताजी चव्हाण याने मंगळवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गावात समजताच मराठा समाज बांधवांनी माकणी चौकात काही काळ ठिय्या आंदोलन करत रास्ता रोखला. यावेळी काही काळ वाहतूक ठप्प होती. यावेळी उपविभागीय अधिकारी गणेश पवार, पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, लोहारा तहसीलदार प्रसाद कुलकर्र्णी, पोलीस निरीक्षक अजित चितंले यांच्यासह अधिकारी दाखल झाले. मराठा नोंदी सापडत नसल्यामुळे देखील लोहारा तालुक्यातील सकल मराठा समाज आक्रमक होताना दिसत आहे. हैदराबाद येथील मराठा समाजाचे रेकॉर्ड तपासण्यात यावे, याचीही मागणी यावेळी करण्यात आली. प्रशासनाने योग्य भूमिका घेतल्यामुळे सदरचे ठिय्या आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात मागे घेण्यात आले.