अरविंद केजरीवाल राजकीय पलटवार करण्यात ‘मास्टर’ आहेत. किंबहुना त्यांच्या राजकारणाचा तोच भक्कम पाया आहे. त्यामुळे ते आपल्याला कोंडीत पकडू पाहणा-यावर जोरदार पलटवार करतात. त्यातून ते कित्येकदा अराजकतेची सीमारेषा ओलांडतात व स्वत:साठी संकटाची स्थितीही निर्माण करतात. मात्र, अशा संकटातून सहीसलामत बाहेर पडण्याचे व समोरच्याचीच गोची करून टाकण्याचे कसब त्यांच्या अंगी आहे. त्यातूनच त्यांनी अवघ्या ११ वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत भाजप व काँग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षांचा पर्याय म्हणून स्वत:ची प्रतिमानिर्मिती करण्यात ब-यापैकी यश मिळविले आहे. आता पुन्हा एकवार त्यांनी आपले हेच राजकीय कसब दाखवत ‘त्यागाची खेळी’ केली आहे. भ्रष्टाचाराविरुद्धचा आवाज बुलंद करून आपल्या राजकीय पक्षाची पायाभरणी करणा-या अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पार्टी हा राजकीय पक्ष भ्रष्टाचारांच्याच आरोपांनी पुरता कोंडीत सापडला होता. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री सिसोदिया, पक्षाचे खासदार संजय सिंग यांना तुरुंगाची वारी करावी लागली. कथित मद्य धोरण गैरव्यवहारात केजरीवाल यांना सूत्रधार ठरवून ‘ईडी’ने त्यांना अटक केल्याने ‘आप’ची प्रतिमा डागाळली होती व भाजपने ‘आप’विरोधात राजकीय रान उठवले होते.
तुरुंगात असताना सहा महिने केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला नाही. राज्यघटनेला त्यांनी अक्षरश: फाट्यावर मारले. त्यांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक झालेला असताना केजरीवाल यांनी हा विरोध सरळसरळ उडवून लावला. मात्र, अटी-शर्थींसह जामिनावर तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांनी राजीनाम्याची घोषणा करून भाजपवर जोरदार पलटवार केला. एवढेच नव्हे तर स्वत:च्या स्वच्छ प्रतिमेची जनमत चाचणीही जाहीर करून टाकली. जनतेने माझे निर्दोषीत्व मला पुन्हा निवडून देऊन सिद्ध केल्यावरच मी पुन्हा मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेईन, अशी घोषणा करून त्यांनी ‘त्यागाची खेळी’ केली. यामुळे भाजपची आता पुरती गोची झाली आहे. शिवाय ही त्यागाची खेळी करताना केजरीवाल यांनी अत्यंत हुशारीने आपल्याशी पूर्णपणे एकनिष्ठ पण स्वच्छ प्रतिमा असणा-या आतिशी मर्लिना सिंह यांची मुख्यमंत्रिपदासाठी निवड केली. आतिशी या केजरीवाल यांच्या एकनिष्ठ! त्या त्यांना गुरूच मानतात.
पक्षातील सर्व संभाव्य दावेदारांना मागे सारून केजरीवाल यांनी त्यांना मुख्यमंत्रिपद दिल्यावर आता त्या केजरीवाल जे म्हणतील तोच शब्द प्रमाण मानणार हे स्पष्टच! त्यामुळे दिल्लीच्या सत्तेवर केजरीवाल यांचेच पूर्ण नियंत्रण राहणार आहे. ही केजरीवाल यांची दुहेरी खेळी आहे कारण सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांना जामीन देताना ज्या अटी-शर्थी घातल्या होत्या त्यातून केजरीवाल यांना मुख्यमंत्रिपदी कायम राहून फारसे काही करण्यास वाव राहिलेलाच नव्हता. त्यांनी मुख्यमंत्रिपद सोडले नसते तर भाजपसह विरोधकांना ‘आप’ची प्रतिमा आणखी मलिन करण्याची आयती संधीच मिळाली असती. त्यामुळे अशा निष्प्रभ कारकीर्दीचा मोह न करता विरोधकांवर जोरदार पलटवार करून जनतेच्या मनात पुन्हा एकवार आपली प्रतिमानिर्मिती करण्याची स्मार्ट खेळी करून केजरीवाल यांनी भाजपसह सर्वच विरोधकांची पुरती गोची तर केलीच पण त्याचवेळी पक्षावरील आपले एकहाती वर्चस्वही पुन्हा सिद्ध केले आहे.
त्यासाठी त्यांनी पत्नीला मुख्यमंत्रिपद देण्याचा मोह निग्रहाने टाळला व विरोधकांची घराणेशाहीच्या आरोपाची संधीही हिरावून घेतली. शिवाय कोरी पाटी असलेल्या आतिशी यांच्याकडे मुख्यमंत्रिपद सोपवून त्यांनी विरोधकांची बोलतीच बंद करून टाकली आहे. केजरीवाल यांच्या या जोरदार पलटवाराचा कसा सामना करायचा याच विवंचनेत भाजप सध्या सापडला आहे. एकंदर पाच महिन्यांनंतर होऊ घातलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी आपल्याभोवती निर्माण झालेल्या राजकीय चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी केजरीवाल यांनी ही स्मार्ट त्यागाची खेळी करून विरोधकांची पुरती गोची केली आहे. आतिशी या पाच महिन्यांसाठी आता दिल्लीच्या मुख्यमंत्री असतील. दिल्लीचे मुख्यमंत्रिपद भूषविणा-या त्या तिस-या महिला ठरल्या आहेत. या अगोदर भाजपच्या सुषमा स्वराज व काँग्रेसच्या शीला दीक्षित यांनी दिल्लीचे मुख्यमंत्रिपद भूषविले आहे.
त्यात सुषमा स्वराज यांचे मुख्यमंत्रिपद आतिशी यांच्याप्रमाणेच औटघटकेचे होते कारण त्यानंतरच्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला होता. असो! उणापुरा चार-पाच महिन्यांचा काळ हाती असणा-या आतिशी यांच्याकडून फारशा मोठ्या कामाची अपेक्षा करता येणार नाहीच. मात्र, त्यांना स्वत:लाही असे काही काम करण्याची इच्छा असल्याचे दिसत नाही. कारण जनतेच्या मनातील मुख्यमंत्री केजरीवालच आहेत व त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठीच आपण प्रयत्न करणार आहोत, असे वक्तव्य करून आतिशी यांनी आपली केजरीवालांवरील एकनिष्ठता स्पष्टच केली आहे. त्यामुळे आतिशी मुख्यमंत्री असल्या तरी दिल्ली सरकारचा रिमोट कंट्रोल केजरीवाल यांच्याच हाती कायम असणार हे स्पष्ट आहे.
केजरीवाल त्यागाची खेळी करून आपल्या प्रतिमानिर्मितीबरोबरच जनतेची सहानुभूती प्राप्त करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार हे स्पष्टच आहे. आपल्याला नरेंद्र मोदी व राहुल गांधी यांचा पर्याय म्हणून स्वत:ची राष्ट्रीय प्रतिमा निर्माण करायची असल्यास त्यासाठी केवळ दिल्लीचे मुख्यमंत्रिपद पुरेसे नाही याची जाणीव केजरीवाल यांना तुरुंगातील मुक्कामात केलेल्या आत्मचिंतनात झालेली दिसते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाभोवतीचा चक्रव्यूह भेदण्यासाठीची खेळी करतानाच नव्या प्रतिमानिर्मितीचाही पाया घातला आहे. दिल्लीतील सामना ‘आप’ विरुद्ध भाजप असा थेट करून केजरीवाल यांनी या सामन्यातून काँग्रेसला बाहेर काढण्याचीही खेळी यातून केली आहेच. केजरीवाल यांच्या या पलटवाराचा सामना विरोधक कसा कणार, याचीच आता उत्सुकता असेल, हे निश्चित!