नाशिक : तीर्थस्थळी दर्शन घेण्यासाठी जाणा-या भाविकांना अल्पदरात काही ना काही प्रसाद दिला जात असतो. त्यानुसार बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये येणा-या भाविकांना देखील प्रसाद वाटप करण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतला आहे. तिरुपती, पंढरपूर व शिर्डीप्रमाणे भाविकांना बुंदी लाडूचा प्रसाद दिला जाणार आहे.
दरम्यान, त्र्यंबकेश्वरमध्ये पुढील वर्षी कुंभमेळा होत आहे. याची तयारी सुरू आहे. ही तयारी सुरू असताना आजच्या गुढीपाडवा निमित्ताने त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनासाठी येणा-या भाविकांना बुंदीचा लाडू प्रसाद स्वरूपात देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यंत याठिकाणी येणा-या भाविकांना प्रसाद स्वरूपात काहीच दिले जात नव्हते. तर बारा ज्योतिर्लिंगांवर प्रसाद दिला जात होता. त्यानुसार त्र्यंबकेश्वर येथे देखील प्रसाद असावा; अशी मागणी भाविकांची होती. त्याला अनुसरून विश्वस्त मंडळाने हा निर्णय घेतला आहे.
प्रसाद म्हणून बुंदीचा लाडू
त्र्यंबकेश्वरमध्ये देखील मंदिर समितीकडून प्रसाद मिळण्याची गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी होती. तिरुपती, पंढरपूर तसेच शिर्डी याठिकाणी भाविकांना अल्प दरात बुंदीचा लाडू प्रसाद म्हणून दिला जात होता. त्यानुसार आता त्र्यंबकेश्वरमध्ये देखील बुंदी लाडूचा प्रसाद मिळणार आहे