पुणे : प्रतिनिधी
कमाल आणि किमान तापमानात वाढ झाल्याने राज्यातील वातावरणात पुन्हा एकदा बदल झाला आहे. गुलाबी थंडीचा जोर ओसरल्याचे चित्र आहे. पुढील दोन आठवड्यात राज्यात काही ठिकणी अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीला राज्यात थंडीची लाट आली होती. पुणे, नाशिक, धुळेसह विदर्भ आणि मराठवाड्यात कडाक्याची थंडी पडली होती.
दरम्यान, तीन आठवडा गुलाबी थंडी राहिल्यानंतर राज्यात पुन्हा हवामानात बदल झालाय. शिवाय राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यता आली आहे. सतत बदलणा-या हवामानामुळे आजारांचे प्रमाण वाढले आहे. थंड, ताप, सर्दी खोकल्यासारखे आजार बळावले आहेत. नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करÞण्यात येत आहे. मुंबई आणि पुण्यासारख्या शहरात हवेची पातळी खालावत चालल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. राज्याच्या किमान आणि कमाल तापमानात चार ते पाच अंशाने वाढ झाली आहे.
पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात ठळक कमी दाब क्षेत्र सक्रिय आहे. ते उत्तर आणि ईशान्येकडे सरकताना आज (ता. २१) या प्रणालीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका काहीसा कमी झालाय. शुक्रवारी (ता. २०) पंजाबच्या ‘आदमपूर’ येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ३.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. महाराष्ट्रात आलेली थंडीची लाट ओसरली असून, धुळे, निफाड, जळगाव, अहिल्यानगर येथे गारठा कायम आहे. उर्वरित राज्यात किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या वर सरकल्याने थंडी कमी झाली आहे. पहाटेच्या वेळी धुक्याची चादर आणि दव पडत असल्याचे चित्र आहे.
धुक्यात हरवली वांगणीची वाट
गेल्या काही दिवसांपासून अंबरनाथ तालुक्याच्या ग्रामीण पट्ट्यात थंडीचा जोर वाढल्यानंतर आज सकाळच्या सुमारास सर्वत्र धुकं पसरल्याचं चित्र पाहायला मिळाले. या धुक्यामुळे दृश्यमानतेत इतकी घट झालीय की १० फुटांवरील रस्ताही दिसत नाहीये. त्यामुळे कल्याण- कर्जत महामार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू आहे. डिसेंबर महिन्यात थंडीचा जोर वाढलाय. कडाक्याच्या थंडीसोबत अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भागात दाट धुकं पसरल्याचं पाहायला मिळत आहे.