सोलापूर-शहरात थंडीचा कडाका सुरु झाल्याने रस्त्याच्या कडेला उबदार कपडे, स्वेटर तसेच ब्लॅकेट विकण्यासाठी दाखल झाले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे तिबेटियन मार्केट भरले जाते. हिवाळ्यामध्ये स्वेटर मफलर स्कार्फ ब्लॅकेट आदींसह उबदार कपडे विकले येथे ग्राहकांची गर्दी वाढत आहे. ५०० रुपयांपासून ते २ हजार या उबदार कपड्यांच्या किमती आहेत.
थंडी वाढल्याने येथे देखील ग्राहकांची खरेदीसाठी वर्दळ वाढत आहे. रंगभवन येथे परगावचे विक्रेते मोठमोठे ब्लँकेट विक्रीसाठी आणले असून, ब्लॅकेट खरेदीसाठी आता ग्राहकांची वर्दळ वाढत आहे.
शहरात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा चाहूल सुरु झाली आहे. पावसाळा महिना संपल्यानंतर हिवाळा ऋतू सुरू झाला आहे. हिवाळा ऋतूची चाहूल लागले असून, दिवाळीमध्येच थंडी हळूहळू वाढत होती. मात्र आता थंडीची तीव्रता दिवसेंदिवस वाढत राहणार आहे. याच बोचऱ्या थंडीपासून आपल्या शरीराचे संरक्षण व्हावे, यासाठी आबालवृद्ध नागरिकांनी तसेच चाकरमान्यांनी आणि विद्यार्थ्यांनी स्वेटर कान टोपी मफलर आदी उबदार कपड्यांचा आधार घेतल्याचे चित्र दिसून येत आहे.
शहरात थंडीचा कडाका म्हणावा तसा नसतो, मात्र यंदाच्या वर्षी थंडी वाढेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. या अंदाजानुसार शहरात आतापासूनच थंडीचा जोर हळूहळू वाढत चालला आहे. दिवाळीमध्ये थंडी मोठ्या प्रमाणात असते.
परंतु यंदाच्या दिवाळीत थंडी थोड्या प्रमाणात जाणवली. आता मात्र थंडीची चाहूल सुरु झाली आहे. शाळा सुरू झाल्याने शाळकरी विद्याथ्यांना सकाळी शाळेला जाताना स्वेटर आणि कानटोपी या उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. तर दुसरीकडे दररोज कामासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना देखील जर्किन स्वेटर मफलर आणि हातमोजे यांचा आधार घेणे बंधनकारक झाले आहे.
वास्तविक पाहता सोलापूरकरांना तीव्र उन्हाळा सहन करण्याची ताकद आहे परंतु, हिवाळा आणि थंडी मोठ्या प्रमाणात वाजण्यास सुरुवात झाली की, सोलापूरकर उबदार कपड्यांचा आधार घेतो. त्या अनुषंगाने शहरातील रस्त्यांवर शाळकरी विद्यार्थ्यांनी आणि चाकरमान्यांनी स्वेटर परिधान करून शाळेला आणि कामाला जाणे पसंत केल्याचे दिसून येत आहे.