26.6 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeसंपादकीयथोडी खुशी, ज्यादा गम!

थोडी खुशी, ज्यादा गम!

रविवारी पॅरिस ऑलिम्पिकचा समारोप झाला. मागच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने एका सुवर्णपदकासह सात पदकांची कमाई केली होती. ती भारताची ऑलिम्पिकमधील सर्वोत्तम कामगिरी होती. त्यामुळे भारतात कधी नव्हे ते ऑलिम्पिक स्पर्धेबाबत उत्सुकता निर्माण झाली होती व पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारत पदकांची दोन आकडी संख्या नक्कीच पार करेल, अशी अपेक्षा निर्माण झाली होती. त्यादृष्टीने भारतीय चमूतील खेळाडूंनी स्पर्धेत जोरदार शुभारंभही केला होता. मात्र, शेवट गोड करण्यात भारताला अपयशच आले.

पॅरिस ऑलिम्पिकचा भारताचा शेवट चढता नव्हे तर उतरणीचा झाला. एकमेव रौप्यपदकासह भारत कसाबसा सहा पदकांच्या संख्येपर्यंत पोहोचला आणि पदकांची दोन आकडी संख्या गाठण्याचे स्वप्न अधुरेच राहिले. विनेश फोगट प्रकरणाचा निकाल आपल्या बाजूने लागला तर आपल्याला टोकियोतील सर्वोत्तम कामगिरीची बरोबरी केल्याचे समाधान मिळेल, एवढेच! मात्र सर्वच बाबतीत भारत महासत्ता म्हणून पुढे जात असल्याचा दावा हल्ली पदोपदी होत असताना क्रीडा क्षेत्रात मात्र आपण महासत्तांच्याच नव्हे तर अनेक छोट्या देशांच्या तुलनेतही बरेच माघारलेले आहोत, हे सत्य आपल्याला पचवावेच लागते. आकडेवारीसहच तुलना करायची तर महासत्ता अमेरिका व चीन यांच्या स्पर्धेतही आपण कुठे दिसत नाही हे कटू वास्तव आहे. अमेरिकेने ऑलिम्पिक स्पर्धेतील सर्व क्रीडा प्रकारांमध्ये म्हणजे ३४ खेळांमध्ये सहभाग नोंदविला व सर्वच्या सर्व ३४ प्रकारांमध्ये पदके जिंकली. एकूण १४ खेळांत सुवर्णपदके अमेरिकेने जिंकली व चीनला एका पदकाने मागे टाकत अव्वल क्रमांक मिळविला.

अमेरिकेच्या चमूमध्ये ५९२ खेळाडूंचा समावेश होता व त्यांनी एकूण १२८ पदके जिंकली. प्रति खेळाडू पदक असा स्ट्राईक रेट काढल्यास तो ४.७० पदके प्रति खेळाडू असा निघतो. स्पर्धेत सहभागी सेंट लुसिया या कॅरेबियन देशाने केवळ चार खेळाडूंचे पथक पाठवले आणि एक सुवर्ण व एक रौप्यपदक जिंकले! चीनने ४०५ खेळाडूंचा चमू पाठवला व एकूण ९१ पदके प्राप्त केली. किर्गिजस्तानने १६ खेळाडूंचा चमू पाठवला व एकूण ६ पदके प्राप्त केली. द. कोरियानेही १६ खेळाडूंचा चमू पाठवून ६ पदके पटकावली. ग्रेनाडाने ६ खेळाडू पाठवले व २ पदके मिळवली! बहरीनने १३ खेळाडू पाठवले व चार पदके पटकावली. इराणने ४१ खेळाडू पाठविले आणि १२ पदके पटकावली. उ. कोरियाने १४१ खेळाडू पाठवले आणि ३२ पदके पटकावली. या तुलनेत भारताने ११७ खेळाडूंचे पथक पाठवले आणि आपल्या पदरात केवळ ६ पदके पडली, ही वस्तुस्थिती आहे. पदकांच्या क्रमवारीत भारत ७१ व्या स्थानावर राहिला. मनू भाकरच्या अपेक्षित तिस-या पदकासह मीराबाई चानूपर्यंत भारताचे सहा खेळाडू चौथ्या क्रमांकावर अडकले व त्यांना पदकांना मुकावे लागले.

मोक्याच्या क्षणी हे अपयश आले नसते तर भारताची पदकसंख्या आज नक्कीच दोन आकडी राहिली असती! लक्ष्य सेन व सात्विक चिराग शेट्टी किंवा पी. व्ही. सिंधू हे खेळाडू इतर स्पर्धांमध्ये ज्या खेळाडूंना अगदी सहजपणे हरवतात त्याच खेळाडूंसमोर ऑलिम्पिकमध्ये मात्र नांगी टाकतात! हे मानसिक दृढतेच्या अभावाने होते की, भारतीय खेळाडूंची या सर्वच स्पर्धेसाठीची तयारी कमी पडते? या प्रश्नाचे उत्तर आपल्याला आता शोधावेच लागेल. ते न शोधता आपण मिळालेल्या यशावर समाधान मानतो म्हणूनच अनेक छोटे-छोटे देशही पदकांच्या स्ट्राईक रेटमध्ये भारताला मागे सोडतात. मुळात ऑलिम्पिकसारख्या सर्वाेच्च जागतिक स्पर्धेत उत्तम कामगिरी करायची तर देशात क्रीडा संस्कृती शेवटपर्यंत रुजायला हवी. ज्यांच्यात गुणवत्ता आहे त्यांना संधी मिळायला हवी व मिळालेल्या या संधीचे सोने करण्यासाठी त्या खेळाडूस सर्वोत्तम प्रशिक्षणापासून सर्वोत्तम सुविधांपर्यंत सर्व काही वेळेवर, नियमित मिळायला हवे. त्यात सरकारी हस्तक्षेप, राजकारण शिरायला नको. तरच अशा स्पर्धांसाठीचे सर्वोत्तम खेळाडू देशात तयार होतात. अमेरिकेसारखा देश ही क्रीडा संस्कृती जोपासतो म्हणूनच त्या देशाचे खेळाडू सर्व क्रीडा प्रकारांमध्ये हमखास पदक पटकाविण्याची किमया करू शकतात.

आपल्याकडे फक्त खेळाडूंवर किती कोटींचा खर्च झाला याचे आकडे सांगून आपण क्रीडा संस्कृती निर्माण केल्याची शेखी मिरवण्यात धन्यता मानतो. सात पदके मिळाली हे चांगलेच पण त्याने हुरळून जाऊन २०३६ च्या ऑलिम्पिक यजमानपदावर दावा ठोकणे कितपत संयुक्तिक? हा प्रश्न ऑलिम्पिकमधील आपले इतर देशांच्या तुलनेतील यश व कामगिरी पाहता वारंवार छळत राहतो. यजमानपद आणि खेळाडूंची कामगिरी यांचा काय संबंध? असा युक्तिवाद यावर नक्कीच होऊ शकतो. मात्र, यजमानपदाला खरा अर्थ तेव्हाच प्राप्त होऊ शकतो जेव्हा देशात सर्वोत्तम खेळाडू तयार होतात, क्रीडा संस्कृती देशात रुजलेली असते व एकूणच देशात खेळासाठीचे ‘मैदान’ प्रत्येकाच्या मनात व कृतीत निर्माण झालेले असते. मुळात ही क्रीडा संस्कृती आपल्या देशात रुजली आहे का? याचे आत्मपरीक्षण व्हायला हवे. अनेक क्रीडा प्रकारांमध्ये भारत आजही ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होत नाही किंवा अशा सहभागासाठी आवश्यक पात्रता आपण गाठू शकत नाही, हे १४० कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात क्रीडा संस्कृती रुजल्याचे, फुलल्याचे लक्षण आहे काय? शालेय पातळीपासून जर क्रीडा संस्कृती रुजविण्याचे व फुलविण्याचे प्रयत्न झाले तरच देशात सर्वोत्तम खेळाडू तयार होतील.

आपल्याकडे खरेच याकडे कधी गांभीर्याने पाहिले जाते काय? हा खरा प्रश्न! खेळाडूने पदक मिळविले की, आपण त्याच्यावर कौतुकाचा आणि धनाचाही वर्षाव करतो. मात्र, असे पदक विजेते घडविण्यासाठी किती गंभीर प्रयत्न करतो? अनेक वर्षांची अथक मेहनत व योग्य प्रशिक्षण याशिवाय पदक विजेते खेळाडू तयार होऊ शकत नाहीत, हे वास्तवच स्वीकारायला आपण तयार नाही. मग या देशात क्रीडा संस्कृती रुजणार कशी आणि आपण क्रीडाक्षेत्रात महासत्ता होणे सोडाच पण सन्मानाने उभे राहणार कसे? हाच प्रश्न! जोवर या प्रश्नाचे प्रामाणिक उत्तर शोधून आपण कामाला लागत नाही तोवर मग असे ‘थोडी खुशी, ज्यादा गमचे’ भावनिक हेलकावे आपल्याला सोसावेच लागणार, हे मात्र निश्चित!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR