ठाणे : प्रतिनिधी
ओला चालकाच्या डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना भिवंडीत घडली आहे. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणा-या भिवंडी तालुक्यातील पाईपलाईनलगतच्या झाडाझुडपात ओला चालकाचा मृतदेह आढळून आला.
दरम्यान, या प्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात भिवंडी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्रम इकबाल कुरेशी (वय २२, रा. जोगेश्वरी, मुंबई) असे हत्या झालेल्या ओला चालक तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत अक्रम कुरेशी हा मुंबई शहरातील जोगेश्वरी भागात आपल्या कुटुंबासह राहत होता. तो मूळचा उत्तर प्रदेश राज्यातील प्रतापगड जिल्ह्याचा रहिवासी होता. अक्रम हा नेहमीप्रमाणे १७ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास ओला कार घेऊन घराबाहेर पडला.
दुपारपर्यंत तो कुटुंबाच्या संपर्कात होता. पोलिस शोध घेत असताना अक्रमचा मृतदेह दगडाने ठेचलेल्या अवस्थेत तानसा-वैतरणा पाईपलाईनलगतच्या झाडाझुडपात आढळून आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर अक्रमचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडीतील स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला.
अक्रमचा भाऊ खुर्शिद आलम इकबालुद्दीन कुरेशी (वय २८) यांच्या तक्रारीवरून भिवंडी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर भिवंडी तालुका पोलिस अज्ञात आरोपींचा शोध घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक एडके यांनी दिली.