27.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रदसरा मेळाव्याला मुंडे बहीण-भाऊ पहिल्यांदाच एकत्र

दसरा मेळाव्याला मुंडे बहीण-भाऊ पहिल्यांदाच एकत्र

बीड : दरवर्षी पंकजा मुंडे यांच्याकडून भक्तिगडावर सावरगाव घाट येथे दसरा मेळावा आयोजित केला जातो. यंदा १२ ऑक्टोबरला होणा-या या मेळाव्याला प्रथमच धनंजय मुंडे उपस्थित राहणार आहेत. विचारांचे सोने लुटायला या वर्षी प्रथमच मीही येतोय, असे ट्वीट धनंजय मुंडे यांनी केले आहे.

लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव आणि त्यानंतर विधान परिषदेवर पंकजा मुंडे यांना संधी मिळाली. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आक्रमक झाले आहेत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागू होणार आहे. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात काय बोलणार याची उत्सुकता असणार आहे.
पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यातून बीड जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा ठरत असते. मात्र आता या मेळाव्याला महायुतीचेच नेते असलेले धनंजय मुंडे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे काय बोलणार? याकडे बीडमधील जनतेचे लक्ष लागले आहे.

धनजंय मुंडे यांनी ट्विट करत ते दसरा मेळाव्याला जाणार असल्याची माहिती दिली. आपल्या ट्विटमध्ये धनंजय मुंडे म्हणाले आहेत की, ‘आपला दसरा, आपली परंपरा…! ही परंपरा जोपासत आपल्याशी संवाद साधून विचारांचे सोने लुटायला या वर्षी प्रथमच मीही येतोय, भगवान भक्तिगडावर सावरगाव घाट येथे. या विजयादशमीला संत भगवानबाबांचे आशीर्वाद घ्यायला मी येतोय, तुम्हीही या…!’

नारायण गडावर जरांगेंचा मेळावा
बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे यांचा मेळावा होत असतानाच बीडजवळील नारायण गड येथे मनोज जरांगे पाटील यांचा देखील पहिल्यांदाच दसरा मेळावा होणार आहे. मराठा आरक्षणासाठी आक्रमक असलेले मनोज जरांगे पाटील या मेळाव्यातून राजकीय भूमिका स्पष्ट करणार का? याकडे सर्वच पक्षांचे लक्ष असणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR