लातूर : प्रतिनिधी
दिवसेंदिवस शिक्षणाची पद्धती बदलत चालली आहे. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा विज्ञान (सायन्स) शाखेकडे असलेला कल कायम आहे. नामांकित महाविद्यालयात या शाखेत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची चढाओढ लागलेली असते. त्याखालोखाल अलीकडच्या काही वर्षांत वाणिज्य (कॉमर्स) शाखेला विद्यार्थी प्राधान्य देऊ लागले आहेत. त्यानंतर आयटीआय, व्होकेशनल व कला शाखा असा प्राधान्य क्रम ठरवला जात आहे.
दहावीचा निकाल लागल्यावर पुढे काय, असा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांना पडतो. आधुनिक काळात आपल्या पाल्याला यशस्वी करिअर घडवता आले पाहिजे, ही चिंता पालकांना सतावत असते. त्यामुळे दहावीनंतर विचारपूर्वकच प्रवेश घेतला जातो. दहावीनंतर विज्ञान, वाणिज्य, कला या पर्यायाबरोबरच चाकोरीबाहेरच्या अभ्यासक्रमांनाही विद्यार्थी प्राधान्य देऊ लागले आहेत. साधारण १५ वर्षांपूर्वी दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी पहिले प्राधान्य आयटीआयला देत असत. त्यानंतर डी. एड्, सायन्स, आर्टस व कॉमर्स शाखेला प्राधान्य दिले जायचे. सध्या ही परिस्थिती बदलली असून दहावीनंतर डी. एड. प्रवेश बंद झाला आहे. डी. एड. पूर्ण केलेले लाखो विद्यार्थी आज बेरोजगार आहेत. त्यामुळे बारावीनंतरही डी. एड. करणा-यांची संख्या पूर्णपणे रोडावली आहे. दहावी झाल्यानंतर विद्यार्थी सायन्स शाखेला प्राधान्य देत आहेत. त्याखालोखाल कॉमर्स शाखेला प्रवेश घेणा-यांची संख्या आहे.
आयटीआयचेही गेल्या चार-पाच वर्षांत फार महत्त्व राहिलेले नाही. तरीही सायन्स, कॉमर्सला प्रवेश न घेणारे विद्यार्थी आयटीआयचा पर्याय स्वीकारत आहेत. स्पर्धा परीक्षा देऊन प्रशासकीय सेवेत जायचे असल्यास सायन्स आणि आर्टस शाखेला प्राधान्य दिले जात आहे. दहावीनंतर १०० विद्याथ्यापैकी ५० विद्यार्थी विज्ञान (सायन्स) शाखा निवडतात. अकरावी, बारावी झाल्यानंतर बीएस्सी, एमएस्सी करायची किंवा वैद्यकीय सेवेत, प्रशासकीय सेवेत करिअर करायचे झाल्यास याच शाखेचा उपयोग होतो. त्याखालोखाल वाणिज्य (कॉमर्स) शाखा निवडण्याकडे विद्यार्थ्यांचा कल आहे. या शाखेतून अकरावी, बारावी झाल्यानंतर बी. कॉम, एम. कॉम करून विविध बँंिकगच्या परीक्षा, खासगी कंपनीत नोकरी मिळू शकते. या सर्वांचा विचार करून विद्यार्थी प्रवेश घेताना दिसत आहेत.