मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणा-या फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या दहावी-बारावीच्या (एसएससी आणि एचएससी) परीक्षेच्या हॉल तिकिटावर आता विद्यार्थ्यांच्या जात प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आला आहे. हॉल तिकिटावर जात प्रवर्गाच्या उल्लेखानंतर शिक्षण क्षेत्रातील अनेकांनी, तसेच शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षकांकडून बोर्डाच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान,
राज्यात सध्या जाती-धर्मावरून वातावरण गढूळ झाले आहे, असे असताना विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावर जातीचा उल्लेख करण्यात शिक्षण विभागाचा काय उद्देश असा सवाल उपस्थित केला जात आहे. शाळेत विद्यार्थ्यांच्या जातीचा उल्लेख काय झाला आहे, त्यांच्या जातीचा प्रवर्ग कोणता आहे, याची माहिती विद्यार्थी आणि पालकांना मिळावी यासाठी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावर जात प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आल्याचे शिक्षण विभागाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
मात्र एकीकडे शाळेच्या दाखल्यावरून जातीचा रकाना हटवण्याची मागणी होत असताना बोर्डाकडून केवळ १५ दिवसांसाठी आवश्यक असलेल्या हॉल तिकिटावर जात प्रवर्ग उल्लेख समोर आला आहे. शिक्षण विभागाने यंदा दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटामध्ये काही बदल केले आहेत. त्यामध्येच विद्यार्थी कोणत्या जातीच्या प्रवर्गात मोडतो हे हॉल तिकिटावर असलेल्या रकान्यात दिसत आहे.
बारावी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकिट वितरित करायला सुरुवात झाली असून दहावी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकिट सोमवारपासून वितरित केले जाणार आहेत. कागदपत्रावर जातीची नोंद चुकली असेल तर पालकांना शिक्षणाधिकारी उपसंचालक कार्यालयातून योग्य ती कागदपत्रे सादर करून तो बदल करून घेता येईल, विद्यार्थ्यांची जातीची नोंद शाळेमध्ये योग्य झाली आहे हे कळण्यासाठी हॉल तिकिटावर जात प्रवर्ग दिला असल्याचे सांगितले आहे.