27.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रदहावी, बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर

दहावी, बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर

११ फेब्रुवारी ते १८ मार्चदरम्यान १२ वीची परीक्षा
पुणे : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सोमवार, दि. १२ ऑगस्ट २०२४ रोजी मोठी घोषणा केली. दहावी आणि बारावीच्या शैक्षणिक वर्षे २०२४-२५ मधील परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या काळात होणार आहे तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या काळात होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे प्रसिद्धीपत्रक जारी करून माहिती देण्यात आली.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या ९ विभागीय मंडळामार्फत दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेतल्या जातात. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच बारावीची परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या तिस-या आठवड्यात आणि माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे दहावीची परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केली जाते. मात्र, यावेळी या परीक्षा लवकर होणार आहेत.
विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया वेळेवर होणे, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा या मंडळाच्या परीक्षेनंतर आयोजित केल्या जात असल्याने अशा परीक्षांचा अभ्यास करण्यास विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा, तसेच पुरवणी परीक्षा लवकर घेवून त्याचा निकाल लवकर जाहीर करणे, या बाबींचा विचार करून यावेळी लवकर परीक्षा घेण्याचे नियोजन केले आहे.

नेहमीपेक्षा लवकर परीक्षा
सन २०२५ ची फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणारी दहावी आणि बारावीची परीक्षा नेहमीपेक्षा १८ ते १० दिवस आधी आयोजित करण्याचा मंडळाचा मानस असून त्या अनुषंगाने लेखी, प्रात्यक्षिक आणि इतर परीक्षा पुढील तारखांना घेण्याचे नियोजन असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR