नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आपले मत हरवलेय की चोरीला गेले? हे जाणून घेण्याचा हक्क मारकडवाडीतील मतदारांना नाकारणे याला संवैधानिक अधिकार म्हणायचे का? महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर लोकांच्या मनात संभ्रम आणि शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पाच टक्के व्हीव्हीपॅट कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिटचे व्हेरिफिकेशन करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली. ‘कर नाही तर डर कशाला?’ असा शब्दांत आव्हान देत ‘दाल में कुछ काला है, या पुरी दालही काली है?’ अशा शब्दांत अमोल कोल्हे यांनी सरकारवर आसूड ओढले.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार ५ टक्के व्हीव्हीपॅट कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिटचे व्हेरिफिकेशन करणे आवश्यक असताना निवडणूक आयोगाने पूर्ण मेमरी बर्न करुन मॉकपोल करण्याच्या सूचना जारी केल्या. यामुळे मतदारांमधील संभ्रम अधिक वाढला असे खासदार डॉ. कोल्हे म्हणाले. कर नाही त्याला डर कशाला? कुछ किया नहीं तो डरते क्युं हो? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. काही लपवण्याचा प्रयत्न होत आहे का? क्या दाल में कुछ काला है, या पुरी दालही काली है? असा सवाल विचारत खा. कोल्हे यांनी कठोर शब्दांत प्रहार केला.
ज्या मतदारांचा बॅलेट पेपरवर विश्वास आहे, त्यांना बॅलेट पेपरवर आणि ज्यांचा विश्वास ईव्हीएमवर आहे, त्यांना ईव्हीएमद्वारे मतदानाचा अधिकार द्यावा, अशी मागणीही खासदार डॉ. कोल्हे यांनी केली. भारताच्या अमृतकाळात पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एक अशी व्यवस्था व्हावी, ज्यामध्ये देशातील मतदारांना आपले मत कुणाला गेले आहे हे समजले पाहिजे, असे ते म्हणाले.
धर्म उंबरठ्याच्या आतच असावा
आक्रमक भाषणासाठी प्रसिद्ध असलेल्या खासदार डॉ. कोल्हे यांनी आज लोकसभेत संयत आणि संयमी भाषेत सरकारचे वाभाडे काढले. हिंदू असो वा मुस्लिम वा ख्रिश्चन धर्म हा घराच्या उंबरठ्याच्या आत असला पाहिजे. उंबरठ्याबाहेर आल्यावर सर्वच जण फक्त भारतीय आणि भारतीयच असले पाहिजेत. तेव्हाच संविधानातील धर्मनिरपेक्षतेचा सन्मान होईल, असे प्रतिपादन खासदार डॉ. कोल्हे यांनी केले.