मुंबई : स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये सुरु असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत दोन दिवसांत महाराष्ट्राने ३ लाख १० हजार ८५० कोटीचे सामंजस्य करार केले असून उद्या ४२ हजार ८२५ कोटींचे करार होत आहेत. अशा रितीने ३ लाख ५३ हजार ६७५ लाख कोटींचे विक्रमी सामंजस्य करार करीत असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. याव्यतिरिक्त १ लाख कोटींच्या गुंतवणुकीत उद्योगांनी स्वारस्य दाखवले असल्याने राज्यावर जागतिक उद्योग आणि गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभारही मानले.
हे सामंजस्य करार केवळ कागदावर न राहता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी जलदगतीने करण्याचा आमचा भर आहे. गेल्या वर्षी दावोस येथे झालेल्या करारांपेक्षा यंदा अधिक गुंतवणुकीचे सामंजस्य करार होत आहेत, असे सांगतानाच उद्योगपूरक, कुशल मनुष्यबळ आणि झटपट निर्णय घेणारे लोकाभिमुख राज्य, अशी महाराष्ट्राची प्रतिमा जगभरात असल्याचे याठिकाणी जाणवल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
दावोस परिषदेच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १६ तारखेस ६ उद्योगांसमवेत १ लाख २ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे करार करण्यात आले. त्यातून २६ हजार रोजगार निर्मिती होणार आहे. १७ जानेवारीस ८ उद्योगांशी २ लाख ८ हजार ८५० कोटींचे गुंतवणूक करार करण्यात आले. त्यातून १ लाख ५१ हजार ९०० रोजगार निर्मिती होईल. उद्या ६ उद्योगांशी ४२ हजार ८२५ कोटींचे करार होत असून त्यातून १३ हजार रोजगार निर्माण होतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.