स्वातंत्र्यदिन सोहळ््याची जय्यत तयारी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दिल्लीत १५ ऑगस्टच्या तयारीला अंतिम स्वरूप देण्यात आले असून त्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी या कार्यक्रमासाठी ३ हजार वाहतूक पोलिस अधिकारी, १० हजार पोलिस कर्मचारी आणि ७०० कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित चेहरा ओळखणारे कॅमेरे तैनात करून सुरक्षा वाढवली आहे.
१५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत व्हीव्हीआयपी पाहुण्यांसह लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिन सोहळा पार पडतो. यंदा स्वातंत्र्य दिन सोहळ््याची जय्यत तयारी करण्यात आली असून, त्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्तही तैनात करण्यात येत आहे. आयजीआय एअर पोर्ट, रेल्वे स्थानके, बस स्टँड, मॉल्स आणि बाजारपेठांसह विविध ठिकाणी अतिरिक्त पोलिस दल आणि निमलष्करी दलही तैनात करण्यात येत आहे. वाहतूक नियंत्रणासाठी तीन हजारांहून अधिक वाहतूक पोलिस तैनात करण्यात येणार आहेत.
राष्ट्रीय राजधानीतील प्रमुख जंक्शनवर आणि लाल किल्ल्याच्या सीमेला जोडणा-या रस्त्यांवरही वाहतूक पोलिस तैनात केले जातील. लाल किल्ल्यावर अनेक पातळ्यांवर सुरक्षा व्यवस्था असणार आहे. ७०० एआय आधारित फेशियल रिकग्निशन सीसीटीव्ही कॅमेरे किल्ल्याच्या परिसरात बसविले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करतील, तेव्हा या मुघलकालीन किल्ल्यावर १० हजारहून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात केले जाणार आहेत.
व्हीव्हीआयपींसाठी
स्नायपर, कमांडो
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर व्हीव्हीआयपी पाहुण्यांच्या सुरक्षेसाठी स्नायपर, स्वॅट कमांडो, शार्पशूटर तैनात केले जाणार आहेत. लाल किल्ल्यावरील कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी येणा-या लोकांची ओळख पडताळून पाहण्यासाठी पोलिस स्मार्टफोन आधारित अॅप्लिकेशन वापरणार आहेत, असेही सांगण्यात आले.