ठाणे : प्रतिनिधी
कल्याण रेल्वे स्थानक परिसरात राहणा-या एका महिलेवर तिच्या दीड महिन्याच्या बालिकेची विक्री करण्याचा प्रसंग ओढवला. दरम्यान, या महिलेला आणि अन्य तिघांना अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने कल्याण पश्चिमेतील रामदेव हॉटेलजवळील सहजानंद चौक येथे सापळा रचत अटक केली आहे.
वैशाली किशोर सोनवणे (वय ३५,) या मध्यस्थ महिलेच्या माध्यमातून हा विक्री व्यवहार होत होता. दीपाली अनिल दुसिंग (वय २७), बाळाची आई, किशोर रमेश सोनवणे (वय ३४ ) अशी महात्मा फुले पोलिस ठाण्यात कोठडीत असलेल्या आरोपींची नावं आहेत.
पोलिस आयुक्तालयातील जनसंपर्क विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश साळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे येथील गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला डोंबिवली येथे राहणारी वैशाली आणि इतर मध्यस्थ हे एका स्त्री किंवा पुरुष जातीच्या लहान बाळाची कोणत्याही कागदपत्रांची पूर्तता न करता विक्री व्यवहार करणार आहेत, अशी गुप्त माहिती मिळाली होती. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक चेतना चौधरी यांनी एक विशेष पथक तयार करून विक्री व्यवहार करणा-यांना सापळ्यात अडकविण्याची व्यूहरचना आखली.
पोलिसांनी बाळ खरेदीसाठी एक बनावट ग्राहक तयार केला. या ग्राहकाच्या माध्यमातून पोलिस मध्यस्थ महिलेच्या संपर्कात गेले. मध्यस्थ महिलेने आपल्याकडे स्त्री जातीचे ४२ दिवसांचे बाळ असल्याचे ग्राहकाला सांगितले. तसेच बाळ हवे असेल तर चार लाख रुपये द्यावे लागतील, असेही ती म्हणाली. याप्रकरणी महात्मा फुले पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेमधील मुलांची काळजी आणि संरक्षण कायद्याने चारही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.