कोलकाता : वृत्तसंस्था
आठवड्यात ७० तास काम करण्याच्या आपल्या विधानावर इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी अप्रत्यक्षपणे भर दिला. आपल्याला प्रचंड कष्ट करावे लागतील, हे तरुणांनी समजून घ्यायला हवे. भारताला पहिल्या क्रमाकांचे राष्ट्र करण्याच्या दिशेने काम करावे लागेल. जर आपण कष्ट करण्याच्या मनस्थितीत नाही आहोत, तर मग कोण करणार? असा सवाल त्यांनी केला.
नारायण मूर्ती यांनी कोलकाता येथे इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी मार्गदर्शन केले. मूर्ती म्हणाले, आपण एकदा जर आपली तुलना जगातील सर्वोत्तम कंपन्यांशी केली, तर मी तुम्हाला सांगू शकतो की, भारतीयांकडे करण्यासाठी खूप काही आहे. आपल्याला आपल्या महत्त्वाकांक्षा मोठ्या ठेवाव्या लागतील. कारण ८० कोटी भारतीयांना मोफत रेशन मिळत आहे. याचा अर्थ असा की, ८० कोटी भारतीय गरीब आहेत. जर आपण प्रचंड कष्ट करण्याच्या मनस्थितीत नाही, तर मग कोण करणार? असा सवाल नारायण मूर्ती यांनी उपस्थित केला.
इथे एका व्यक्तीने मला सांगितले की, एक चिनी कर्मचारी भारतीय व्यक्तीच्या तुलनेत ३.५ टक्के जास्त काम करतो. आपल्यासाठी निरर्थक गोष्टी लिहिणे, दु:खी, घाणेरडं आणि गरीब राहणे सोपे आहे. त्यामुळे मला वाटतं की, आपण हे म्हणायला नको की, आम्ही ऑफिसमध्ये जाणार नाही. लोकांना माझी विनंती आहे की, त्यांनी आपले आयुष्य स्वत:चे मूल्य समजून घेण्यासाठी समर्पित करावे, असे नारायण मूर्ती म्हणाले.