मुंबई : प्रतिनिधी
रोहन देशपांडे हे बिव्हेंट्रिक्युलर सहाय्यक उपकरण (बीआयव्हीएडी) वर उपचार घेतल्यानंतर देशातील पहिले असे रुग्ण ठरले आहेत, ज्यांची एकाचवेळी हृदय-यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली.
रोहन यांना इस्केमिक कार्डियोमायोपॅथी असल्याचे निदान झाले होते आणि हृदय प्रत्यारोपणासाठी त्यांची नोंदणी करण्यात आली होती. प्री-ट्रान्सप्लांट चाचणी दरम्यान त्यांना आधीपासूनच ग्रेड ३ यकृत फायब्रोसिस असल्याचे आढळले. योग्य दात्याची प्रतीक्षा करत असताना रोहन (नाव बदलून) यांच्या प्रकृती अधिक खालावली. त्यांना हृदयविकाराच्या लक्षणांसह मूत्रपिंडाच्या कामगिरीत घट झाली होती, ज्यामुळे त्यांना बाहेरील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना स्थिर ठेवण्यासाठी इनोट्रोप्स आणि व्हॅसोप्रेसर्स यांसारख्या औषधांचा वापर केला गेला. मात्र, प्रकृतीत सुधारणा झाली नाही, त्यामुळे त्यांना रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात हलविण्यात आले. डॉ. अन्वय मुळे यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स हॉस्पिटलमध्ये प्रगत हृदय शस्त्रक्रिया विभागाने बिव्हेंट्रिक्युलर सहाय्यक उपकरण बसवण्याची महत्त्वाची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यांचे नाव राष्ट्रीय अतिआवश्यक प्रत्यारोपण यादीत समाविष्ट करण्यात आले.