पनवेल : तालुक्यातील शिरढोण गावाजवळ मुंबई-गोवा महामार्गावरील शोरूमशेजारी गुरुवारी सायंकाळी ४६ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ माजली होती. मृत व्यक्तीचे नाव सुशांत कुमार कृष्णा दास असे आहे. सुशांतचा गळा चिरून त्याची हत्या करण्यात आली होती.
याप्रकरणी नवी मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी अवघ्या काही तासांत हत्या करणा-या २० वर्षीय अमित रामक्षय राय याला अटक केली आहे. अमित व सुशांत एकाच हॉटेलमध्ये काम करत होते. अवघ्या दोनशे रुपयांच्या वादातून हत्या झाल्याचे अमितने पोलिसांना दिलेल्या जबाबात कबूल केले.
मृत सुशांत शिरढोण येथील साईप्रसाद हॉटेलमध्ये स्वयंपाकघराचा मुख्य पर्यवेक्षक म्हणून काम करत होता. सुशांतच्या हत्येनंतर तो काम करत असलेल्या हॉटेलमधील सुशांतचे सहकारी कर्मचारी व इतरांची चौकशी पोलिसांनी गुरुवारी सकाळी सुरू केली. सुशांत हा शिरढोण गावातील धनाजी महाडिक यांच्या चाळीत रहात होता. सुशांतचा गळा चिरून त्याची हत्या केल्याने परिसरात नेमके सुशांतचे वैरी कोण याबाबत चर्चा सुरू होती.