बीड : प्रतिनिधी
बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराडवर अद्याप मोक्काअंतर्गत कारवाई का झाली नाही? असा सवाल उपस्थित करत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पोलिस तपासावर नाराजी व्यक्त केली. तर मोबाईल टॉवरवर चढून जीव देणार असल्याचा इशारा त्यांनी दिला होता.
धनंजय देशमुख यांनी पोलिसांना चकवा देत गावातील पाण्याची टाकी गाठली. पाण्याच्या टाकीवर चढून धनंजय देशमुख यांनी आंदोलन सुरू केले. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कांवत यांच्या विनंतीनंतर ते तब्बल दोन तासांनी पाण्याच्या टाकीवरून खाली उतरले.
मस्साजोगमध्ये धनंजय देशमुख यांनी आज पाण्याच्या टाकीवर आंदोलन सुरू केले होते. धनंजय देशमुख यांनी आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासह पोलिस धनंजय देशमुख यांना करत होते. तर दुसरीकडे धनंजय देशमुखांच्या पाठोपाठ सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देखील पाण्याच्या टाकीवर चढली होती. तसेच मस्साजोगचे ग्रामस्थ देखील आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले.
पोलिसांनी पाण्याच्या टाकीवर जाण्यासाठी तयारीही केली होती. मात्र, धनंजय देशमुखांच्या सहका-यांनी पाण्याच्या टाकीची शिडी काढून टाकली. त्यामुळे पोलिसांवर खालीच हतबलपणे उभे राहण्याशिवाय कोणताही पर्याय उरलेला नव्हता. पाण्याच्या टाकीखाली फायरब्रिगेडची गाडी देखील बोलावण्यात आली होती. तर मनोज जरांगे पाटील यांनी ४ ते ५ वेळा धनंजय देशमुख यांच्याशी फोनवरून संपर्क साधला होता. बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कांवत यांनी देखील धनंजय देशमुख यांच्याशी फोनवरून चर्चा केली.
देशमुखांनी फोडला हंबरडा
मनोज जरांगे पाटील आणि नवनीत कांवत यांच्या तब्बल दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीवरून खाली आले. धनंजय देशमुख हे खाली येताच त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना मिठी मारत हंबरडा फोडला. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना धनंजय देशमुख म्हणाले की, ज्यांनी माझ्या भावाला कटकारस्थान करून संपवले त्यांना फाशीची शिक्षा द्या.