छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे अडचणीत आले आहेत. मात्र आता धनंजय मुंडे यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांनी भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून निवडणूक जिंकल्याचा आरोप करुणा मुंडे यांनी केला आहे.
दरम्यान, संतोष देशमुख हत्याप्रकरणात धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत आले असून राजीनाम्यासाठी महायुतीतील आमदारांसह विरोधी पक्षाकडून दबाव वाढत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंडेंना अभय दिले.
करुणा मुंडेंचा दावा आहे की, त्यांचे धनंजय यांच्यासोबत कायदेशीर लग्न झालेले आहे. त्यांनी याचिका दाखल करून गंभीर आरोप मंत्री मुंडेंवर केले आहेत. त्यामुळे मंत्री मुंडेंचा पाय पुन्हा खोलात गेला आहे.
मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात करुणा मुंडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात निवडणूक याचिका सादर केली आहे. धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणूक २०२४ भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून जिंकल्याचा प्रमुख आरोप करुणा मुंडे यांनी केला आहे. याचिकेमध्ये त्यांनी मंत्री मुंडेंवर इतरही आरोप केले आहेत. वकील चंद्रकांत ठोंबरे यांच्यामार्फत त्यांनी याचिका दाखल केली आहे.