बीड : प्रतिनिधी
सरकारच्या तपास यंत्रणा काम करत आहेत. पण, कुठेही मुंडे यांचे नाव समोर आलेले नाही. ओबीसी नेते मोठा होतोय म्हणून त्यांना जर टार्गेट केले जात असेल आणि त्यांच्यावर जर अशी वेळ आली तर आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू. त्यांच्यासाठी जे करता येईल ते आम्ही करु, असेही तायवाडे म्हणाले. ते दोषी असतील तर आम्ही दोषी माणसाच्या पाठीशी ओबीसी समाज उभा राहणार नाही, असे ही ओबीसी नेते बबनराव तायवाडे म्हणाले.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरुन राजकारण तापले आहे. या हत्येचा मास्टरमाइंड मंत्री धनंजय मुंडे यांचा जवळचा कार्यकर्ता वाल्मिक कराड असल्याचा आरोप करण्यात येत आहे. काही दिवसापूर्वी बीडमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. यावेळी अनेक नेत्यांनी धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद काढून घेण्याची मागणी केली. दरम्यान, आता यावरुन तायवाडे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये बबनराव तायवाडे यांनी आंदोलनाचा इशारा दिला. तायवाडे म्हणाले,
बीडमध्ये जी घटना झाली त्या घटनेचा आम्ही निषेध करतो. या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे. पण, हे प्रकरण डोळ्यासमोर ठेऊन जर ओबीसी समाजाला टार्गेट होणार असेल तर त्याचा आम्ही निषेध करु. मागील एक वर्षापासून त्या परिसरात मराठा आणि ओबीसीमध्ये फूट पडली होती. निवडणुकीत पुन्हा एकत्र आल्याचे दिसत होते, पण आता पुन्हा एकदा ही फूट दिसत आहे, असंही तायवाडे म्हणाले.
बबनराव तायवाडे म्हणाले, ओबीसी नेता मोठा होतोय म्हणून जर धनंजय मुंडे यांना टार्गेट केलं जात असेल तर आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहे. त्यांच्यासाठी जे काही करता येईल तेव्हा आम्ही ते करेन. ते जर या प्रकरणात दोषी आढळले तर समाज त्यांच्या पाठिमागे उभा राहणार नाही, असंही तायवाडे म्हणाले.
दोन दिवसापूर्वी जो मोर्चा झाला तो एका समाजाचा नव्हता. त्या मोर्चात सर्वच समाजाचे लोक होते. त्या घटनेचा निषेध व्हायलाच पाहिजे होता. त्या मोर्चाचे आम्ही समर्थन करु. पण, पडद्याच्या मागे राहून दोषी नसल्याच्या व्यक्तीला बदनाम करण्याचा प्रयत्न असेल आणि त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न असेल तर आम्ही त्यांच्या मागे उभा राहणार, असा इशाराही तायवाडे यांनी दिला.