लातूर : प्रतिनिधी
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाव्रून राज्यभरातील वातावरण प्रचंड तापले आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे सकल मराठा समाजाकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आले. त्यामुळे लातूर-परभणी रोडवरील वाहतूक खोळंबली आहे.
दरम्यान, लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. याठिकाणी मराठा समाज चांगलाच आक्रमक झालेला पाहायला मिळाला. सध्या रेणापूरमध्ये चक्काजाम आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली असून रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. या चक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रेणापूरमध्ये तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
यावेळी मोर्चेक-यांनी संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय द्या, अशी मागणी केली. जिल्हाभरात चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आले आहे… लातूर शहरातील पाच नंबर चौक, अहिल्यादेवी होळकर चौक, छत्रपती संभाजी राजे चौक, रेणापूर शहरातील रेणापूर नाका, बोरगाव काळे, लातूर-नांदेड रस्त्यावरील चाकूर येथेही चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आले आहे. उदगीर, अहमदपूर तालुक्यातील अनेक भागात चक्का जाम आंदोलन सुरू आहे.
लातूर-बार्शी रस्त्यावरील वाहतुकीवर परिणाम
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट करणा-यांना तात्काळ फासावर लटकवा. मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा. यासाठी आज चक्का जाम आंदोलन करण्यात आले आहे. लातूर-बार्शी रस्त्यावरील बोरगाव काळे येथे रास्ता रोको आणि चक्का जाम आंदोलन करण्यात आले आहे. याचा परिणाम वाहतुकीवर पाहायला मिळत आहे.