मुंबई : प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय अडकले आहेत. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला असल्याची राज्यभरात चर्चा सुरू झाली. मात्र आज मंत्रिमंडळ बैठकीसाठी राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे उपस्थित झाले. यावेळी त्यांनी माध्यमांना राजीनामा दिला नसल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला नाही, मात्र विरोधी पक्ष अजूनही धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही आहेत. खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, नैतिकतेच्या आधारे धनंजय मुंडेंचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला पाहिजे.
संतोष देशमुख यांच्या लहान मुलीकडे पाहून या प्रकरणात माणुसकीच्या नात्याने निर्णय झाला पाहिजे असे म्हटले आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.