22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeसंपादकीयधनदांडग्यांचे प्रताप!

धनदांडग्यांचे प्रताप!

पुण्यातील पोर्शे कार अपघाताची घटना ताजी असतानाच मुंबईतील वरळीत पुन्हा ‘हिट अँड रन’चा प्रकार घडला. दिवसेंदिवस धनदांडग्यांची बेदरकार, मुजोर वृत्ती वाढतच चालली आहे. वरळीत एका राजकीय नेत्याच्या कुपुत्राने दाम्पत्याला धडक देऊन महिलेला फरफटत नेण्याचे निर्दयी कृत्य केले. हे धनदांडगे अपेयपान करून पैशाच्या जोरावर आणि राजकीय वरदहस्ताने कायदेशीर पळवाटा शोधून तुरुंगाबाहेर येतात. वारंवार घडणारे हे प्रकार थांबायलाच हवेत अन्यथा संयम सुटल्याने जनता आक्रमक होईल.

पुण्यात ‘हिट अँड रन’चा मुद्दा ऐरणीवर असतानाच बोपोडी परिसरात हॅरिस ब्रिजखाली रविवारी मध्यरात्री भरधाव कारने चिरडल्याने गस्तीवरील एका पोलिसाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा पोलिस गंभीर जखमी झाला. दुस-या एका घटनेत रविवारी रात्री दहाच्या सुमारास मुंबई-बंगळुरू महामार्गावर ताथवडे येथे डिकॅथलॉन मॉलसमोर भरधाव ट्रकने धडक दिल्याने पत्रकार शरद गायकवाड यांचा मृत्यू झाला. चिरडण्याच्या, चेंगराचेंगरीच्या घटना एकदा का सुरू झाल्या की त्या थांबता थांबत नाहीत. ‘हिट अँड रन’ची एक घटना बीडमध्येही घडली. एका भरधाव कारने एका पोलिस उपनिरीक्षकालाच उडवले. बीडमधील नेकनूरजवळ पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेच्या बंदोबस्तासाठी जाणा-या पोलिस उपनिरीक्षक मच्छिंद्र नन्नवरे यांना नेकनूरच्या दिशेने जात असलेल्या एका कारने जोरदार धडक दिली. कारच्या धडकेने नन्नवरे खाली पडले तर कारही पुढे रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. पुण्यानंतर वरळी परिसरातही रविवारी सकाळी ‘हिट अँड रन’ची घटना घडली.

भरवेगात जाणा-या एका बीएमडब्ल्यू कारने दुचाकीला धडक दिल्याने कावेरी नाखवा या महिलेचा जागीच मृत्यू झाला तर तिचे पती प्रदीप नाखवा यांना किरकोळ दुखापत झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे पालघरचे उपनेते राजेश शहा यांचा पुत्र मिहीर शहा कार चालवत होता. अपघातानंतर तो पळून गेला. धडक बसल्यानंतर कावेरी कारच्या बोनेटवर पडल्या. मात्र, कारचालकाने अचानक ब्रेक मारल्याने कावेरी कारच्या चाकाखाली आल्या. कारचालकाने काही अंतरपर्यंत कावेरी यांना फरफटत नेले. अपघातानंतर मिहीर पळून गेला. त्याच्या अटकेसाठी पोलिसांच्या चार टीम रवाना झाल्या आहेत. मिहीरने शनिवारी रात्री जुहू येथील एका बारमध्ये मित्रांसोबत पार्टी केली होती. पार्टीचे १८ हजार रुपये बिल मिहीरच्या मित्रांनी दिल्याचे सांगितले जाते. कारवर एकनाथ शिंदे गटाचे चिन्ह होते. अपघातानंतर कारवरील चिन्ह पुसण्याचा प्रयत्न झाला आणि कारच्या मागील नंबरप्लेट काढून ती गाडीत ठेवण्यात आली होती. वरळीतील हिट अँड रन प्रकरणातील आरोपी कोणीही असो, पक्षाचा पदाधिकारी किंवा कार्यकर्ता असला तरी त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही.

ज्या कुटुंबावर अन्याय झाला आहे, त्यांना सरकार न्याय मिळवून देईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ घटना रोखण्यासाठी आता आणखी कठोर कारवाई करण्यात येणार आहे. रात्री उशिरा पब, रेस्टॉरंट, बार सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांचा परवाना रद्द करण्यात येईल असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. अलिकडे ‘हिट अँड रन’ची प्रकरणे खूप वाढली आहेत. धनदांडगे स्वत:च्या धुंदीत आणि मस्तीत सर्वसामान्यांना किडा-मुंगीसारखे चिरडत आहेत. या मंडळींना पैशाचा इतका माज चढलेला असतो की ते अपघातानंतर पोलिसांना सहकार्य करत नाहीत. ते इतके निगरगट्ट बनलेले असतात की, दयामाया, सौजन्य हे प्रकार त्यांच्या गावीही नसतात. आपल्या हातून अपघात घडल्यावर अपघातग्रस्त व्यक्तींना रुग्णालयात नेणे, त्यांच्यावर योग्य ते उपचार वेळेवर करणे हे दोषी व्यक्तीचे कर्तव्यच असते. परंतु आजची तरुण पिढी इतकी मस्तवाल, उन्मत्त आणि बेफाम झाली आहे की, त्यांच्याकडे दयामाया, कणव अथवा सौजन्य हा प्रकारच उरलेला नाही.

या पिढीला काही धाकच उरलेला नाही. त्यांचे फाजील लाड चालवले जातातच कसे. अल्पवयीन मुलांच्या हातात महागड्या गाड्या दिल्या जातातच कशा? वाहन चालवण्याचा परवाना नसताना, गाडीची कागदपत्रे नसताना या मुलांचे आई-बाप मुलाला वाहन चालवायची परवानगी देतातच कशी? इथे असा प्रश्न पडतो, मुले बिघडली की त्यांचे आई-बाप? मनुष्यवधासारखा भयंकर गन्हा नाही हे माहीत असूनही आई-वडील आपल्या मुलांची काळजी का घेत नाहीत? आरोपी हा राजकारणी अथवा बिल्डर पुत्र असेल तर विचारायलाच नको सामान्य माणसाचा जीव हा पैशापुढे, राजकारण्यांपुढे कवडीमोल आहे हे वारंवार सिद्ध झाले आहे. त्यामुळे प्रश्न पडतो की, कायद्यामध्ये पीडित, निरपराध माणसांना न्याय मिळण्याची कुठलीच व्यवस्था नाही काय? एखाद्याचा जीव घेऊनही धनाढ्य व्यक्तींना सहजासहजी जामीन मिळतो कसा? बेदरकारपणे वाहन चालवून निष्पाप व्यक्तींचे बळी घेणा-या मुजोर वृत्तीला चाप लावावा कसा हा मोठा गंभीर प्रश्न आहे. पोलिस प्रशासन किंवा न्यायव्यवस्था त्यावर उत्तर शोधण्याचा प्रयत्न करीत असली तरी आता समाजानेसुद्धा विचार करण्याची वेळ आली आहे.

त्यातही पालकवर्गाने आता ती जबाबदारी उचलायला हवी. मोबाईलचे दुष्परिणाम तरुण पिढी भोगत आहे हे लक्षात आल्यानंतर पालक मंडळी जशी खडबडून जागी होते तसे पोराच्या हातात वाहन देताना विचार झाला पाहिजे. मुलांचे फाजील लाड पुरवायचे नाहीत यावर पालक वर्ग ठाम राहिल्यास अनेक संभाव्य अपघात टाळता येऊ शकतील. दुसरे म्हणजे वाहन चालवण्याचे नियम आणखी कडक करायला हवेत आणि त्याची अंमलबजावणीही काटेकोरपणे केली गेली पाहिजे. आजकाल वाहतुकीचे नियम सर्रासपणे मोडले जात आहेत परंतु त्याची दखलच घेतली जात नाही. वाहतुकीचे साधे नियम जरी पाळले गेले तर ब-याच अपघातांना आळा बसू शकतो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR