बावनकुळेंची मध्यस्थी, ४.५ तास चर्चा, विरोधकांचा हल्लाबोल, जरांगेंचा संताप
मुंबई : प्रतिनिधी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण अत्यंत आक्रमकपणे लावून धरून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव आणणा-या भाजपा आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची चार दिवसांपूर्वी मुंबईत गुप्त भेट झाल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली. यावर आमदार धस यांनी आपण त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी घरी गेल्याचे सांगितले, तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंडे-धस यांच्यात ४.५ तास चर्चा झाली असून, त्यांच्यात मतभेद आहेत, मनभेद नाहीत, असे म्हटले. दरम्यान, या दोघांमध्ये बावनकुळे यांनी समेट घडवून आणल्याची आपली माहिती असून हे अतिशय गंभीर असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या. यावरून विरोधकांनीही जोरदार हल्लाबोल केला. त्यावर धस यांनी सारवासारव केली.
यासंदर्भात धस म्हणाले की, धनंजय मुंडे याच्या डोळ््याचे ऑपरेशन झालेले आहे. त्यामुळे दुस-या दिवशी लपून छपून नव्हे तर दिवसा मी त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेलो. तिथे जाऊन प्रकृतीची विचारपूस केली. संतोष देशमुखचा लढा आणि तब्येतीची चौकशी यात कसल्याही प्रकारचा संबंध नाही. कृपया तो जोडू नये. या लढ्यात मी विरोधातच राहणार आहे. पुढच्या काही दिवसांत मी आणखी काही सांगणार आहे, ते तुम्हाला समजेलच. मी धनंजय मुंडे यांचा राजीनामा अजूनही मागितलेले नाही. त्यांच्याच पक्षाचे लोक राजीनामा मागत आहेत, असे सांगत संतोष देशमुख यांच्या हत्येबाबतचा लढा चालूच राहील, असे धस म्हणाले.
यावेळी आमच्यात साडेचार तास भेट झालेली नाही. बावनकुळे यांनीच तसे सांगितल्याची आठवण करून दिली, तेव्हा तुम्ही त्यांनाच विचारा, असे धस म्हणाले. आपण फक्त घरी जाऊन प्रकृतीची विचारपूस केली, असा खुलासा प्रारंभी केला. यावरून विरोधकांनी धस यांना लक्ष्य केले असून, ही तर राजकीय सेटिंग असल्याचे म्हटले. तसेच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी धस यांच्यावर हल्लाबोल केला.
बावनकुळे म्हणतात
४.५ तास झाली चर्चा
आमदार सुरेश धस यांनी आपण धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी गेलो होतो. त्यांच्या निवासस्थानी अर्धा तास चर्चा केली, असा खुलासा केला. परंतु भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आम्ही साडेचार तास चर्चा केल्याचे म्हटले. एवढेच नव्हे तर त्यांच्यात मतभेद आहेत. परंतु मनभेद नाहीत, ते लवकरच दूर होतील, असा खुलासा केला. त्यावरून संशय बळावला आहे.
मुंडेंच्या कार्यालयाने
भेटीचे वृत्त नाकारले
एकीकडे धस-मुंडे भेट झालेली असताना धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाने अशी कोणतीही भेट झालेली नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे या भेटीवरून उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे.
अशी भेट दुर्दैवी : दमानिया
मला ४-५ दिवसांपूर्वी धस-मुंडे यांची भेट झाल्याचे समजले. त्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांनी मध्यस्थी केल्याची माहिती आहे. पण अशी भेट दुर्दैवी आहे. आता धस त्यांच्याविरोधात लढतील की नाही? हे संशयास्पद आहे, असे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या.
धस यांची विश्वासार्हता संपली
सुरेश धस आणि मुंडे यांची भेट झाल्याची माहिती आहे. हे वृत्त मी ऐकले. यात तथ्य असेल तर आमदार सुरेश धस यांची विश्वासार्हता संपलेली आहे. यासोबतच मुख्यमंत्री फडणवीस यांचीही विश्वासार्हता संपलेली असेल, असे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या.
आ. धस यांचा सूर बदलला
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी धस-मुंडे यांच्यात साडेचार तास बैठक झाली, असे म्हटले. त्यावर आमदार धस यांचे सूर बदलले. त्यानंतर त्यांनी दुस-यांदा पत्रकार परिषद घेऊन मला बावनकुळे यांनी जेवायला बोलावले होते. मी तिथे गेलो, त्यावेळी तेथे मुंडे साहेब आले. आमच्यात अर्धा तास चर्चा झाली, अशी कबुली दिली. त्या अगोदर त्यांनी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मुंडेंच्या निवासस्थानी गेल्याचे म्हटले होते.