शिरुर अनंतपाळ : शकील देशमुख
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार शिरूर अनंतपाळ तालुक्यात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. यामुळे लातुक्यातील मांजरा व घरणी नदी तुडुंब भरून वाहू लागली आहे. शेत शिवारातून भरून येणा-या नाल्यामुळे मांजरा नदीला पुर परस्थिती निर्माण झाली असून नदी काठच्या शेतात पुराचे पाणी घुसल्याने सोयाबीन सह खरीप पिकांचे नुकसान झाले आहे.पाऊस सुरुच असताना नदीपात्रात प्रकल्पाचे पाणी सोडण्यात येत असल्याने शेतक-यांंचीचिंता वाढली आहे.
तालुक्यातील तीन ही मंडळात पावसाने दमदार हजेरी लावली असून शिरूर अनंतपाळ महसुल मंडळात ६४.५ मिमी, साकोळ ७१.८ मिमी, हिसामाबाद ७९.३० मिमी तर तालुक्यात सरासरी ७१.९० मिमी पावसाची नोंद झाली आहे.या संततधार पावसाने ग्रामीण भागातील जनजीवन ठप्प झाले असून पावसाचा परिणाम शहरातील बाजारपेठेवर देखील दिसून आला. गेल्या दोन दिवसापासून होणा-या पावसाने नदी नाले वाहते झाले असून प्रकल्पातील पाणी पातळीत वाढ होत असल्याने शेतक-यांतून समाधान व्यक्त होत आहे.
दरम्यान जून महिन्यापासून पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे शेतक-यांनी खरीप हंगामाच्या पेरण्या केल्या होत्या.त्यानंतर अधूून मधून पावसाच्या हलक्या सरी व ऊन, पाऊस असा खेळ सुरू होता.त्यामुळे शेतक-यांना दमदार पावसाची अपेक्षा होती. शुक्रवारी सायंकाळनंतर पावसाला सुरुवात झाली होती. शनिवारी दिवसभर संततधार पाऊस पडत होता तर शनिवारी रात्री देखील पावसाने जोर केल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे.त्यामुळे गेले दोन दिवस अजिबात सूर्यदर्शन झालेले नाही. गेल्या दोन दिवस सुरू असलेल्या दमदार पावसामुळे पावसाळ्यात कोरडे पडलेले तालुक्यातील सर्व नदी-नाले दुथडी भरुन वाहू लागले आहेत.