धाराशिव : प्रतिनिधी
एसटी बसमध्ये चढत असताना निलेगाव ता. तुळजापूर येथील एका प्रवाशाचे १ लाख २५ हजार रूपये किंमतीचे २५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. चोरीची ही घटना दि. २० जानेवारी रोजी नळदुर्ग येथील बसस्थानकात घडली. या प्रकरणी फिर्यादी अंजुम शहाबाज शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलीस ठाणे येथे अज्ञात चोरट्याच्या विरोधात दि. २१ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धाराशिव जिल्ह्यातील मोठ्या व गर्दी असलेल्या बसस्थानकात प्रवाशांची रोकड व सोन्याचे दागिने चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. बहुतांश बसस्तानकात पोलीस बंदोबस्त असतानाही चो-या होत आहेत.
पोलिसांनी सांगितले की, निलेगाव ता. तुळजापूर येथील अंजुम शहाबाज शेख ह्या दि. २० जानेवारी रोजी दुपारी नळदुर्ग येथे आल्या होत्या. त्या नळदुर्ग बसस्थानकात धाराशिव-हैद्राबाद बसमध्ये चढत असताना चोरट्यांनी त्यांच्या जवळील अंदाजे १ लाख २५ हजार रूपये किंमतीचे २५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने गर्र्दीचा फायदा घेवून चोरुन नेले. या प्रकरणी अंजुम शेख यांनी दि.२१ जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पोलीस ठाणे येथे कलम ३७९ भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.