शिर्डी : प्रतिनिधी
नवीन वर्षाच्या सुरुवातीला हजारो भाविकांनी देवदर्शनासाठी शिर्डी साई दरबारी गर्दी केली होती. राज्यातील अनेक तीर्थस्थळी दर्शन घेऊन भाविकांनी नववर्षाची सुरुवात केली आणि यावेळी मंदिरात भरभरुन दानही दिले. नाताळच्या सुट्या व नवीन वर्षाच्या स्वागतादरम्यान भाविकांकडून साईंच्या चरणी कोटींचे दान अर्पण करण्यात आले. २५ डिसेंबर ते २ जानेवारी दरम्यान ९ दिवसांत भाविकांकडून एकूण १६ कोटी ६१ लाख ८० हजार रकमेचे दान करण्यात आले.
शिर्डी साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी माध्यमांना याबाबत माहिती दिली. नाताळाच्या सुट्या नवीन वर्षाच्या स्वागतादरम्यान ८ लाखांहून अधिक भाविक साईचरणी नतमस्तक झाले.देणगी काऊंटरवरून ०३ कोटी २२ लाख २७ हजार ५०८ रुपये प्राप्त तर पीआरओ सशुल्क देणगी पासेसचे ०१ कोटी ९६ लाख ४४ हजार २०० रुपये आणि दक्षिणा पेटीतून ०६ कोटी १२ लाख ९१ हजार ८७५ रुपयांचे दान साईचरणी अर्पण केले. यासोबतच डेबिट-क्रेडिट कार्ड, ऑनलाईन देणगी, चेक, डी. डी. देणगी, मनी ऑर्डर असे एकूण ०४ कोटी ६५ लाख ७३ हजार ६९८ जमा झाले आहेत. तसेच सोने, चांदीचेही दान दिले गेले आहे.