अॅट्रॉसिटीचा गुन्हा, मुंबई पोलिसांची हायकोर्टात हमी
मुंबई : प्रतिनिधी
नवाब मलिकांविरोधातील प्रकरणाचा तपास ४ आठवड्यांत पूर्ण करू, अशी हमी मुंबई पोलिसांनी हायकोर्टात दिली. अॅट्रॉसिटी गुन्ह्यात नवाब मलिक यांच्यावर कारवाई का नाही, असा सवाल समीर वानखेडे यांनी दाखल केलेल्या याचिकेतून केला होता. त्या याचिकेवर सुनावणी झाली. त्यावेळी मुंबई पोलिसांनी ही हमी दिली.
आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी हायकोर्टात नवाब मलिक यांच्याविरोधात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (अॅट्रॉसिटी) तक्रार दाखल केली आहे. नवाब मलिक यांच्याविरोधात १४ ऑगस्ट २०२२ रोजी गोरेगाव पोलिस ठाण्यात अॅट्रॉसिटीअंतर्गत वानखेडेंनी तक्रार नोंदवली होती. त्यानंतर पोलिसांनी मलिक यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. मात्र, या प्रकरणी मलिक यांना अद्यापपर्यंत अटक करण्यात आलेली नाही किंवा त्यांच्यावर आरोपपत्रही दाखल केलेले नाही.
नवाब मलिक यांच्यावर मनी लॉड्रिंगचा आरोप असून ते सध्या वैद्यकीय जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात समीर वानखेडे यांनी खोटी कारवाई करून शाहरूख खानकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होता. हे सगळे प्रकरण नवाब मलिकांनी बाहेर आणले. नवाब मलिकांनी आपल्यावर केलेले आरोप खोटे असल्याचे सांगत समीर वानखेडे यांनी त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर नवाब मलिक यांच्यावर दाऊदशी संबंधित प्रॉपर्टी खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला होता.