छ. संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथे असलेल्या औरंगजेबाच्या कबरीला हटवण्याच्या मुद्यावरून पेटलेल्या राजकीय वादाचे पडसाद नागपुरातील महाल परिसरात उमटले. या परिसरात सोमवारी दिवसभर तणावाचे वातावरण असतानाच सायंकाळी तरुणांच्या दोन गटांत भीषण राडा झाला. यातून वातावरण तापले व मोठा जमाव रस्त्यावर उतरला.
यात काही समाजकंटकांनी जाळपोळ केली व पोलिसांच्या दिशेने दगडफेक करत धक्काबुक्की केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. दगडफेकीत १५ पोलिस जखमी झाले असून पोलिसांनी २० तरुणांना ताब्यात घेतले. या घटनेवरून राजकीय आरोप-प्रत्यारोपाला धार आली असून वंचितबहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
महाराष्ट्र सरकारमधील एक विषारी मंत्री दररोज समाजात द्वेष पसरवण्याचे आणि विभाजन करण्याचे काम करत आहे. महाराष्ट्रात दोन समाजात द्वेष पसरवण्यासाठी बाहेरूनही लोक आणले जात आहे. नागपूर शहरात सायंकाळच्या सुमारास महाल परिसरातील चिटणीस पार्क, तसेच गांधी गेट परिसरात दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला होता. काही तरुणांमध्ये वाद झाला आणि मग वेगवेगळ्या अफवा पसरत गेल्या. यामुळे मोठा जमाव परिसरात जमला. यावेळी घोषणाबाजीदेखील करण्यात आली.
पोलिसांवरदेखील दगडफेक करण्यात आली व धक्काबुक्की करण्यात आली. यात दोन पोलिसांचे कपडेदेखील फाटले. काही समाजकंटकांनी रस्त्यांवरील वाहनांना आग लावली. काही तरुण यावेळी जखमी झाले व त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. परिस्थिती लक्षात घेता चिटणीस पार्क येथे अतिरिक्त कुमक मागवण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरकरांनी शांतता बाळगावी, असे आवाहन केले.