मुंबई : औरंगजेबाच्या कबरीला हटविण्यावरून नागपुरातील महाल परिसरात सायंकाळी तरुणांच्या दोन गटांत भीषण राडा झाला. यातून वातावरण तापले व मोठा जमाव रस्त्यावर उतरला. यात काही असामाजिक तत्त्वांनी जाळपोळ केली व पोलिसांच्या दिशेने दगडफेक करत धक्काबुक्की केली. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. दगडफेकीत १५ पोलिस जखमी झाले आहेत. दरम्यान, आता या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मंत्री संजय शिरसाट यांनी महाविकास आघाडीवर आरोप केले आहेत.
नागपुरातील कालची घटना महाविकास आघाडीने घडवून आणली असा मोठा आरोप मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. औरंगजेबाच्या कबरीशी मुस्लिमांना काही देणं-घेणं नाही, असेही मंत्री शिरसाट म्हणाले.
ज्या ठिकाणी कबर आहे त्या ठिकाणी मस्लिम लोक जात नाहीत. मुस्लिमांना कबरीशी काही देणं-घेणं नाही. कालची घटना ही महाविकास आघाडीने घडवून आणली आहे. शिवाजी महाराज यांचा इतिहास जर औरंगजेबामुळे लिहायचा असे जर यांचे संशोधन असेल तर महाराजांच्या बाजूला औरंगजेबाचा पुतळा उभा करायचा आहे का?, असा सवालही शिरसाट यांनी केला.
संजय शिरसाट म्हणाले, हे लोक अशी मूर्खपणाची वक्तव्यं करत आहेत. त्यांना आम्ही मानत नाही. विरोधकांना कालची घटना अंगलट आली आहे हे कळालं आहे. आम्हाला महाराष्ट्रात कुठेही दंगल नको आहे. नितेश राणे यांच्या बोलण्याने कुठेही काहीही होत नाही, असेही संजय शिरसाट म्हणाले.