केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली माहिती
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवार, दि. २८ डिसेंबर रोजी सकाळी ११.४५ वाजता दिल्लीतील निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली.
सरकारने डॉ. मनमोहनसिंग यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला आहे. राजधानी दिल्ली येथील निगमबोध घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. संरक्षण मंत्रालयाला डॉ. मनमोहनसिंग यांच्या पार्थिवावर लष्करी सन्मानासह अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था करावी, अशी विनंती केली आहे, असे सांगण्यात आले.
तत्पूर्वी, कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सिंग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी २८ डिसेंबर रोजी स्मारकासाठी जागा मागितली. डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर एका पवित्र ठिकाणी अंत्यसंस्कार व्हावेत, जिथे स्मारकही उभारता येईल, अशी मागणी करणारे पत्र खरगे यांनी मोदींना लिहिले. मात्र केंद्र सरकारकडून त्यांच्या मागणीला प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे कॉंग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली.